मेघालयातील प्रसिद्ध हत्याकांड प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. चौकशीदरम्यान सोनम रघुवंशीने तिचा पती राजा रघुवंशीच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याची कबुली दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिलाँगमधील पोलिसांनी सोनमसमोर घटनेशी संबंधित ठोस पुरावे सादर केले तेव्हा ती रडू लागली. त्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली. मेघालय पोलिसांनी तिचा प्रियकर राज कुशवाहासोबत समोरासमोर चौकशी केली तेव्हा तिने तिचा गुन्हा कबूल केला.
मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा पोलिसांनी सोनम आणि राज कुशवाहा या दोघांसमोर रक्ताने माखलेले जॅकेट, सोनमचा रेनकोट आणि इतर पुरावे ठेवले होते. पोलिसांनी या पुराव्यांबद्दल सोनमला विचारपूस केली तेव्हा ती गप्प बसली. पण सर्व पुरावे पाहून सोनमने आपला गुन्हा कबूल केला. सोनमने कबूल केले की तिने आकाश राजपूत, विशाल उर्फ विकी ठाकूर आणि आनंद कुर्मी या तीन कॉन्ट्रॅक्ट किलरसह तिचा पती राजा रघुवंशीची हत्या केली होती.
दरम्यान, सोनमच्या कबुलीनंतर या प्रकरणाने निर्णायक वळण घेतले आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लवकरच संपूर्ण घटनेवर अधिकृत पत्रकार परिषद घेतली जाईल आणि कटात सहभागी असलेल्या इतर लोकांनाही अटक केली जाऊ शकते.
