बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांचे वरिष्ठ सल्लागार झाहिद उर रहमान यांना भारतात प्रवेश करण्याची परवानगी मिळाल्यानंतरही, नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (आयजीआय) विमानतळावर भारतीय इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना काही काळासाठी रोखल्यानंतर ढाका येथे परतले. यामुळे नवा वाद होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
बांगलादेशस्थित ‘प्रोथोम आलो’ या वृत्तपत्राच्या वृत्तानुसार , माहिती, प्रसारण आणि संस्कृती विषयक पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून कार्यरत असलेले जाहिद उर रहमान, इंडियन ओशन रिम असोसिएशनच्या (IORA) बैठकीला उपस्थित राहण्यासाठी रविवारी संध्याकाळी नवी दिल्लीत दाखल झाले होते. मात्र, इमिग्रेशन तपासणीदरम्यान अनेक तास थांबवून ठेवल्यानंतर, त्यांनी आपला दौरा पुढे चालू न ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्याऐवजी ते श्रीलंकामार्गे मायदेशी परतले.
माहितीनुसार, भारतीय राजधानीत म्हणजेच दिल्लीत उतरल्यानंतर रहमान यांना भारतीय इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी सुमारे अडीच तास थांबवून ठेवले होते. माध्यमांच्या अहवालात म्हटले आहे की, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर अखेरीस परवानगी मिळाली असली तरी, त्याई भारतात प्रवेश न करता एअर इंडियाच्या विमानाने कोलंबोला जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर, रहमान सोमवारी पहाटे कोलंबोमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर सकाळी त्यांनी ढाक्याकडे आपला प्रवास पुढे चालू ठेवला. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने १५ आणि १६ जून रोजी आयोजित केलेल्या इंडियन ओशन रिम असोसिएशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीच्या २८ व्या बैठकीत सहभागी होण्यासाठी रहमान भारतात आले होते.
अहवालानुसार, नवी दिल्लीतील बांगलादेशच्या उच्चायुक्तालयाने शुक्रवारी एका राजनैतिक पत्राद्वारे रहमान यांच्या दौऱ्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला औपचारिकपणे कळवली होती. वृत्तपत्राने असेही म्हटले आहे की, बांगलादेशचे उच्चायुक्त एम. रियाझ हमीदुल्ला यांनी या दौऱ्यापूर्वी संबंधित भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. भारतीय अधिकाऱ्यांनी या घटनेवर सार्वजनिकरित्या भाष्य केलेले नाही. या वर्षाच्या सुरुवातीला बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) पुन्हा सत्तेवर आल्यानंतर भारत आणि बांगलादेश द्विपक्षीय संबंधांच्या एका नवीन टप्प्याशी जुळवून घेत असतानाच ही घडामोड समोर आली आहे.
हे ही वाचा:
दिव्यांशी सिंग बनणार भारतीय हवाई दलातील पहिल्या महिला कमिशन्ड अधिकारी
पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर स्लोव्हाकियन कलाकारांनी गायले ‘वंदेमातरम’
मदरशातील शिक्षकासोबत लग्न ठरल्याने मुलीने संपवले जीवन
अमेरिका इराण करारानंतर सेन्सेक्स, निफ्टीत धमाका
बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री डॉ. खलीलुर रहमान यांनी या घटनेला “दुर्दैवी” म्हटले असून, हे प्रकरण राजनैतिक मार्गांनी हाताळले जात असल्याचे सांगितले. बांगलादेशात सरकार बदलल्यानंतर, बीएनपी-प्रणित सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला भारतात प्रवेश करताना अडचणींचा सामना करावा लागल्याची ही पहिलीच नोंदवलेली घटना आहे, ज्यामुळे या दोन शेजारी देशांमधील बदलत्या संबंधांकडे लक्ष वेधले गेले आहे.







