अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर २५ टक्के तर चीनवर १० टक्के अतिरिक्त कर लादण्याची घोषणा केली. यानंतर जगभरात खळबळ उडाली होती. यानंतर आता यासंदर्भात नवी माहिती समोर आली आहे. कॅनडा आणि मेक्सिकोमधून होणाऱ्या आयातीवरील अतिरिक्त कर लावण्याची अंमलबजावणी किमान ३० दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे, अशी घोषणा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे व्यापार युद्धाचा धोका निर्माण झाला होता. कॅनडा आणि मेक्सिकोला तात्पुरती सूट दिली असली तरी चीनवरील १० टक्के कर मंगळवारपासून लागू होणार आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याशी दोन वेळा फोनवर चर्चा केली, तर मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षा क्लॉडिया शेनबॉम पारडो यांच्याशी एकदा फोनवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी कर स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, चीनला यातून कोणतीही सूट न देता चीनवरील १० टक्के कर मंगळवारपासून लागू झाला आहे.
कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांनी सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी उपस्थित केलेल्या सीमा समस्यांवर ओटावाने अधिक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच सीमा सुरक्षा प्रयत्नांना चालना देण्यासाठी सहमती दर्शविल्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी किमान ३० दिवसांसाठी शुल्क थांबवण्यास सहमती दर्शवली आहे. त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी चांगला संवाद झाला. कॅनडा १.३ अब्ज डॉलर्सची सीमा योजना राबवत आहे. नवीन हेलिकॉप्टर, तंत्रज्ञान आणि कर्मचाऱ्यांसह सीमा मजबूत करणे, अमेरिकन भागीदारांशी समन्वय वाढवणे आणि फेंटानिलचा प्रवाह थांबवण्यासाठी संसाधने वाढवणे यासाठी प्रयत्नशील असणार आहे, असे ट्रुडो यांनी ट्विट केले आहे. ट्रुडो यांच्या घोषणेनंतर लगेचच, ट्रम्प यांनी याला दुजोरा दिला आणि शनिवारी जाहीर केलेले अतिरिक्त कर शुल्क ३० दिवसांच्या कालावधीसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
सोमवारी, मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षा क्लॉडिया शेनबॉम पारडो यांनीही ट्रम्प यांच्याशी चर्चा केल्यानंतर मेक्सिकोमधून अमेरिकेत होणाऱ्या बेकायदेशीर औषधांच्या प्रवाहाला आळा घालण्यासाठी उत्तर सीमेवर तात्काळ १०,००० नॅशनल गार्ड सैनिक तैनात करण्याचे आश्वासन दिले. यानंतर ट्रम्प यांनी मेक्सिकोवर लादलेला कर स्थगित केला आहे.
हे ही वाचा:
जया बच्चन यांची महाकुंभवर टीका; गंगेचे पाणी सर्वात प्रदूषित!
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांच्याकडून सरस्वती पूजेच्या शुभेच्छा; आश्चर्य व्यक्त!
एक नजर इंदिरा गांधी यांच्या काळातील अर्थसंकल्पावर !
डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी कॅनडा, मेक्सिकोमधून होणाऱ्या आयातीवर २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावण्याचे निर्देश दिले. बेकायदेशीर स्थलांतर आणि अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंतेचा हवाला देत हा निर्णय घेण्यात आला. कॅनडा आणि मेक्सिकोने प्रत्युत्तर म्हणून प्रति-कर शुल्काची घोषणा केली होती. मात्र, आता कॅनडा आणि मेक्सिकोवर लादलेला कर निर्णय स्थगित करण्यात आलेला आहे. दुसरीकडे, चीनसाठी असा कोणताही करार झालेला नाही. ट्रम्प यांनी असा इशाराही दिला आहे की, ते चीनवरील शुल्क आणखी वाढवू शकतात. चीन फेंटानिल पाठवणे थांबवेल अशी आशा असून जर ते तसे करत नसतील तर शुल्क लक्षणीयरीत्या वाढेल असा कठोर इशारा ट्रम्प यांनी दिलेला आहे.