देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे फेब्रुवारी महिन्यात भेटणार आहेत. या भेटीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी हे डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी व्यापक चर्चा करतील. ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच द्विपक्षीय अमेरिका दौरा असणार आहे.
माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन नेते १३ फेब्रुवारी रोजी वॉशिंग्टनमध्ये भेटणार आहेत. पंतप्रधानांच्या भेटीसाठी अमेरिकेशी चर्चा सुरू असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितल्यानंतर काही दिवसांतच ही तारीख समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच द्विपक्षीय अमेरिका दौरा असेल. तर, ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर काही आठवड्यांतच वॉशिंग्टन डीसीला द्विपक्षीय भेटीसाठी जाणाऱ्या काही निवडक परदेशी नेत्यांमध्ये पंतप्रधानांचा समावेश होईल.
योजनेनुसार, पंतप्रधान मोदी हे पॅरिसचा दोन दिवसांचा दौरा संपवल्यानंतर वॉशिंग्टन डीसीला रवाना होतील. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यामुळे भारत आणि अमेरिका दोन्ही देशांमधील भागीदारी आणखी दृढ होईल. यासाठी आणखी प्रयत्न केले जात आहेत.
हे ही वाचा:
सहकार्य दाखवताच अतिरिक्त करामधून कॅनडा, मेक्सिकोला तात्पुरती सूट; चीनवरील १० टक्के कर लागू
जया बच्चन यांची महाकुंभवर टीका; गंगेचे पाणी सर्वात प्रदूषित!
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांच्याकडून सरस्वती पूजेच्या शुभेच्छा; आश्चर्य व्यक्त!
डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत यश मिळवत २० जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभानंतर, पंतप्रधान मोदी यांनी २७ जानेवारी रोजी त्यांच्याशी संवाद साधला. दोन्ही नेत्यांनी व्यापार, ऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रात भारत- अमेरिका सहकार्य वाढवण्यावर लक्ष केंद्रित करून विश्वसनीय भागीदारीसाठी काम करण्याचे वचन दिले आहे. दरम्यान, अमेरिकन सरकारच्या निमंत्रणावरून ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. तसेच यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र ट्रम्प यांना सुपूर्त केले होते.