अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वात बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध कारवाई सुरू आहे. अमेरिकेने लष्करी विमानांचा वापर करून बेकायदेशीर स्थलांतरितांसाठी उड्डाणे सुरू केली आहेत. बेकायदेशीर स्थलांतरितांना मोठ्या प्रमाणावर हद्दपार करणे हे ट्रम्प यांच्या प्रचारातील प्रमुख निवडणूक आश्वासनांपैकी एक आहे. याबाबतच्या सरकारी आदेशावर ट्रम्प यांनी स्वाक्षरीही केली आहे.
काही दिवसांपूर्वीच दोन लष्करी विमाने प्रत्येकी ८० स्थलांतरितांना घेऊन अमेरिकेतून ग्वाटेमालाला गेले होते. यानंतर आता अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीय स्थलांतरितांना पुन्हा भारतात पाठवले जात असल्याची माहिती आहे. स्थलांतरितांना घेऊन जाणारे अमेरिकेचे लष्करी विमान भारताकडे रवाना झाले आहे, अशी माहिती वृत्तसंस्था रॉयटर्सने दिली आहे. सी- १७ विमान स्थलांतरितांना घेऊन भारताकडे रवाना झाले. दरम्यान अमेरिकेहून भारताच्या दिशेने निघालेल्या विमानात कितीजण आहेत, हे स्पष्ट झालेलं नाही. पेंटागॉनने एल पासो, टेक्सास आणि सॅन दिएगो, कॅलिफोर्निया येथे अमेरिकन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या ५,००० हून अधिक स्थलांतरितांना परत पाठवण्यासाठी विमान सेवा सुरू केली आहे. आतापर्यंत, लष्करी विमानांनी ग्वाटेमाला, पेरू आणि होंडुरास येथे स्थलांतरितांना नेले आहे.
ट्रम्प यांनी सत्तेत येताच अमेरिकन इतिहासातील सर्वात मोठ्या हद्दपारीचे आश्वासन दिले आहे. शिवाय यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंटने (ICE) सुमारे १८,००० कागदपत्रे नसलेल्या भारतीय नागरिकांची प्रारंभिक यादी तयार केली आहे. प्यू रिसर्च सेंटरच्या आकडेवारीनुसार, भारतातून आलेले अंदाजे ७,२५,००० बेकायदेशीर स्थलांतरित अमेरिकेत राहतात. मेक्सिको आणि एल साल्वाडोरनंतर अनधिकृत स्थलांतरितांची ही तिसरी सर्वात मोठी लोकसंख्या आहे.
हे ही वाचा:
ठरलं! पंतप्रधान मोदी, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प फेब्रुवारीमध्ये अमेरिकेत भेटणार
सहकार्य दाखवताच अतिरिक्त करामधून कॅनडा, मेक्सिकोला तात्पुरती सूट; चीनवरील १० टक्के कर लागू
जया बच्चन यांची महाकुंभवर टीका; गंगेचे पाणी सर्वात प्रदूषित!
गेल्या महिन्यात, नवी दिल्लीने म्हटले होते की, भारत नेहमीच कागदपत्रे नसलेल्या भारतीयांना त्यांच्या देशात कायदेशीररीत्या परत आणण्यास तयार आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले होते की भारत अमेरिकेतून कोणाला भारतात हद्दपार केले जाऊ शकते याची पडताळणी करत आहे. प्रत्येक देशासह, आणि अमेरिकाही त्याला अपवाद नाही. जर आमचे कोणतेही नागरिक तिथे बेकायदेशीरपणे राहत असतील आणि जर आम्हाला खात्री असेल की ते आमचे नागरिक आहेत, तर आम्ही नेहमीच त्यांना भारतात कायदेशीररित्या परत आणण्यास तयार आहोत, असे जयशंकर म्हणाले.