दिल्लीत सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून निवडणुकीपूर्वी प्रचारतोफा थंडावल्या आहेत. अशातच आम आदमी पार्टीच्या (आप) अडचणींमध्ये वाढ झाली असून मुख्यमंत्री आतिशी यांच्यासह काही कार्यकर्त्यांवर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांनी मंगळवारी दोन गुन्हे दाखल केले आहेत. एक, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरुद्ध आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल आणि दुसरा, पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला केल्याबद्दल त्यांच्या समर्थकांवर.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री आतिशी या त्यांच्या साधारण ६० समर्थकांसह १० वाहनांमधून फतेह सिंग मार्गावर पोहचल्या होत्या. यावेळी पोलिसांनी त्यांना आचारसंहितेचे कारण देत तेथून निघून जाण्यास सांगितले तेव्हा त्यांनी नकार दिला. अखेर निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून आतिशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
सहकार्य दाखवताच अतिरिक्त करामधून कॅनडा, मेक्सिकोला तात्पुरती सूट; चीनवरील १० टक्के कर लागू
जया बच्चन यांची महाकुंभवर टीका; गंगेचे पाणी सर्वात प्रदूषित!
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांच्याकडून सरस्वती पूजेच्या शुभेच्छा; आश्चर्य व्यक्त!
दुसरा गुन्हा आतिशी यांच्या समर्थकांवर दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल आणि पोलिसांवर हल्ला केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित घटनेच्या व्हिडिओमध्ये, आतिशी यांचा एक समर्थक सागर मेहता हा एका पोलिसाला मारहाण करताना दिसत आहे. पोलिस कर्मचारी व्हिडिओ बनवत असताना आतिशी यांच्यासोबत असलेल्या दोन मुलांपैकी एक असलेल्या सागरने व्हिडिओ बनवणाऱ्या पोलिसाला थप्पड मारली. यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.