२००८ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार, लष्कर-ए-तोयबाचा (एलईटी) दहशतवादी हाफिज मुहम्मद सईद याचा मुलगा हाफिज तल्हा सईद याने ५ फेब्रुवारी रोजी ‘काश्मीर एकता दिना’निमित्त लाहोरमध्ये एका रॅलीत प्रक्षोभक भाषण दिल्याची माहिती आहे. बुधवारी झालेल्या रॅलीत बोलताना तल्हा याने त्याचे वडील हाफिज मुहम्मद सईद याची सुटका करण्याची मागणी केली आहे तसेच लोकांना कोणत्याही किंमतीवर काश्मीर भारतापासून मुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे.
सभेला संबोधित करताना तल्हा याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेत त्यांना इशारा दिला आहे. “मी पंतप्रधान मोदींना इशारा देतो की काश्मीर मुस्लिमांचा आहे आणि आम्ही तुमच्याकडून काश्मीर हिसकावून घेऊ. लवकरच पाकिस्तानचा भाग होईल,” असे तल्हा म्हणाला. त्याने पुढे लष्कर-ए-तोयबाला दहशतवादी संघटना म्हणून जागतिक स्तरावर घोषित करण्याचा निर्णय फेटाळून लावला आहे. शिवाय दावा केला की, हा केवळ त्यांच्या वडिलांना बदनाम करण्यासाठी मोदींचा प्रचार होता. पाकिस्तान सरकारने त्यांच्या धोरणाचा आढावा घ्यावा आणि हाफिज सईदला तुरुंगातून सोडावे अशी मागणीही तल्हा याने केली. हाफिज सईद दोषी नाही; तो तुरुंगात का त्रास सहन करत आहे? तल्हाने प्रश्न करत त्याच्या वडिलांच्या कृतीचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला.
लाहोरमधील एका रॅलीत तल्हा सईदने काश्मीरला भारतापासून मुक्त करण्याची प्रतिज्ञा केली. लष्कर-ए-तोयबा आणि जमात-उद-दावाचा (JuD) संस्थापक हाफिज सईद हा २६/११ च्या मुंबई हल्ल्यांसह भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले घडवून आणण्यात एक प्रमुख आरोपी आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवादाला आर्थिक मदत केल्याच्या अनेक प्रकरणांमध्ये त्याला ७८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती, तर २०२२ मध्ये त्याला ३१ वर्षांची अतिरिक्त शिक्षा सुनावण्यात आली होती. २०१२ मध्ये, अमेरिकेने सईदच्या अटकेसाठी माहिती देणाऱ्याला १० दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले. अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी लष्कर-ए-तोयबा आणि जमात-उद-दावा यांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे आणि त्यांच्या कारवायांवर बंदी घातली आहे.
हे ही वाचा:
पाकचे पंतप्रधान म्हणतात, काश्मीरसह सर्व प्रश्न भारताशी चर्चेद्वारे सोडवायचेत
निदर्शकांनी बांगलादेशला स्वातंत्र्य देणाऱ्या शेख मुजीबुरहमान यांचे घर जाळले
ईडीकडून १९ ब्रोकिंग कंपन्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल
फडणवीस राजकारणातला बिनजोड पैलवान, बाहुबली!
दुसरीकडे पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी देण्याचे काम सुरूचं ठेवले आहे. २०२४ च्या पाकिस्तानी सार्वत्रिक निवडणुकीत,तल्हा सईद याने लाहोरच्या एका मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. हाफिज सईद याच्या समर्थित पक्ष पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीगने (पीएमएमएल) त्याला उमेदवारी दिली होती. मात्र, मतदारांनी त्याला मत न दिल्यामुळे त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता.