काश्मीर हा भारताचा भाग असून त्यासंबंधीचे प्रश्न हे भारतासाठी अंतर्गत चर्चेचे विषय असल्याचे वारंवार भारताने बजावून सांगूनही पाकिस्तानकडून काश्मीरवर सातत्याने टिपण्णी केली जाते. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांनी आता भारतासोबत चर्चेची तयारी दाखवली आहे. पंतप्रधान शहबाझ शरीफ यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानला काश्मीरसह सर्व प्रश्न भारताशी चर्चेद्वारे सोडवायचे आहेत. बुधवारी आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले आहे.
काश्मिरींना पाठिंबा देण्यासाठी दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या ‘काश्मीर एकता दिन’ या कार्यक्रमानिमित्त मुझफ्फराबाद येथे पाकव्याप्त काश्मीर (पीओके) विधानसभेच्या विशेष सत्राला संबोधित करताना शाहबाझ शरीफ यांनी हे विधान करत शांततेचा संदेश दिला. आम्हाला काश्मीरसह सर्व प्रश्न चर्चेद्वारे सोडवायचे आहेत, असे ते म्हणाले. भारताने ५ ऑगस्ट २०१९ च्या विचारातून बाहेर पडावे आणि संयुक्त राष्ट्रांना दिलेली आश्वासने पूर्ण करावीत. संवाद सुरू करावा, असे त्यांनी जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून टाकणाऱ्या आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करणाऱ्या कलम ३७० रद्द करण्याचा संदर्भ दिला.
पंतप्रधान शरीफ म्हणाले की, पाकिस्तान आणि भारतासाठी पुढे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संवाद हाच असला पाहिजे, जो १९९९ च्या लाहोर जाहीरनाम्यात नमूद करण्यात आला होता. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पाकिस्तान भेटीदरम्यान मान्य करण्यात आला होता.
हे ही वाचा:
ईडीकडून १९ ब्रोकिंग कंपन्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल
फडणवीस राजकारणातला बिनजोड पैलवान, बाहुबली!
उत्तराखंडमध्ये एका लिव्ह इन रिलेशनशिपची नोंद
महाराष्ट्रात १ कोटी तर मुंबईत १० लाख बांगलादेशी घुसखोर!
दहशतवादमुक्त, शांततापूर्ण वातावरणात पाकिस्तानशी सामान्य, मैत्रीपूर्ण संबंधांची इच्छा भारताने सातत्याने व्यक्त केली आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश देशाचा अविभाज्य भाग आहेत आणि नेहमीच राहतील असे पाकिस्तानला वारंवार बजावून सांगितले आहे. भारताने कलम ३७० रद्द केल्यानंतर दोन्ही राष्ट्रांमधील संबंध ताणले गेले होते. शरीफ यांनी भारतावर शस्त्रास्त्रांचा साठा केल्याचा आरोपही केला आहे. त्यांनी म्हटले की, शस्त्रास्त्रांचा साठा केल्याने शांतता येणार नाही किंवा या प्रदेशातील लोकांचे भवितव्य सुधारणार नाही. काश्मिरी लोकांना त्यांच्या आत्मनिर्णयाचा अधिकार मिळेपर्यंत पाकिस्तान त्यांना आपला अटळ नैतिक, राजनैतिक आणि राजकीय पाठिंबा देत राहील, असेही त्यांनी सांगितले आहे.