नेपाळ पर्यटन मंडळाने (एनटीबी) जाहीर केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, २०२५ च्या पहिल्या दहा महिन्यांत नेपाळात भारतीय पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मात्र, एकूण परदेशी पर्यटकांच्या आगमनात थोडी वाढ नोंदली गेली आहे. भारत नेपाळच्या पर्यटन उद्योगासाठी सर्वात मोठा स्त्रोत बाजार आहे. या हिमालयीन देशात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांपैकी जवळपास चतुर्थांश पर्यटक भारतीय असतात.
एनटीबीच्या आकडेवारीनुसार, या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या काळात भारतातून आलेल्या पर्यटकांची संख्या ११ टक्क्यांनी घटून २,४३,३५० झाली. तथापि, एकूण परदेशी पर्यटकांच्या आगमनात ०.३ टक्क्यांची वाढ होऊन ती संख्या ९,४३,७१६ वर पोहोचली आहे. याच काळात दुसऱ्या शेजारी देश चीनहून आलेल्या पर्यटकांमध्येही ५.३ टक्क्यांची घट नोंदवली गेली असून ती संख्या ७८,९२९ वर आली आहे. चीन सध्या नेपाळचा तिसरा सर्वात मोठा पर्यटन बाजार आहे. कोविडपूर्व काळात तो दुसऱ्या क्रमांकावर होता.
हेही वाचा..
ख्रिस गेल वाट बघत राहिला, जम्मू काश्मिरातील प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजकच पळून गेले
वडिलांचं नाव लपवण्यात लाज का वाटतेय?
बस-टिपरच्या भीषण धडकेत २० जण ठार
माय भारत ॲपद्वारे युवकांना रोजगाराच्या संधी
पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांच्या म्हणण्यानुसार, भारतीय पर्यटकांच्या घटामागे मुख्य कारण म्हणजे “जेन-जी आंदोलनाचा परिणाम” आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या या हिंसक आंदोलनात ७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले. सरकारी व खासगी मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. हयात रीजेंसी आणि हिल्टन यांसारख्या आंतरराष्ट्रीय हॉटेल ब्रँड्सना आंदोलनादरम्यान मोठा फटका बसला. हिल्टन हॉटेल पूर्णपणे जळून खाक झाले, तर हयात हॉटेल देखभालीसाठी बंद ठेवावे लागले.
भारतीय पर्यटकांसाठी नेपाळच्या सहलींचे आयोजन करणाऱ्या स्पीडी टुरिझम अँड ट्रॅव्हल्स प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक उमेश दानई यांनी सांगितले, “नेपाळला जाण्याची तयारी करणाऱ्या भारतातील चार गटांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपली सहल रद्द केली. त्यांना रस्त्याने नेपाळ गाठायचे होते, पण त्यांनी प्रवासाची योजना रद्द केली.” युनिक अॅडव्हेंचर इंटरनॅशनल चे संचालक खुम बहादुर सुबेदी यांनी आयएएनएसला सांगितले की, “जेन-जी आंदोलनानंतर भारतातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या, हवाई आणि भूमार्ग दोन्हींतून कमी झाली आहे. आजही त्याचा परिणाम जाणवतो आहे. विशेषतः रस्त्याने येणारे पर्यटक घटले आहेत, कारण ते सुरक्षा स्थितीबद्दल चिंतेत आहेत.”
एनटीबीच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात एकूण पर्यटक आगमनात १८.३ टक्क्यांची घट झाली असून, याचे मुख्य कारण जेन-जी आंदोलन आहे. त्या महिन्यात भारतातून येणारे पर्यटक ३२.३ टक्क्यांनी, चीनहून ३४.९ टक्क्यांनी, आणि अमेरिकेतून ४ टक्क्यांनी घटले. हे तिन्ही देश नेपाळसाठी सर्वात मोठे पर्यटन स्रोत आहेत.







