जगभरासाठी उत्सुकतेचा आणि चर्चेचा विषय ठरलेल्या महाकुंभ मेळाव्यासाठी रशिया आणि युक्रेनमधील काही सिद्धपुरुष गुरुवारी प्रयागराज येथे आले होते. तसेच त्यांनी महाकुंभमध्ये आध्यात्मिक ऐक्याचे प्रतीक असलेल्या ‘कीर्तन’ कार्यक्रमात आणि प्रार्थना कार्यक्रमात हजेरी लावली होती. महाकुंभ मेळाव्याला लाखोंच्या संख्येने देश- विदेशातून लोक आले असून त्रिवेणी संगमात आतापर्यंत करोडो लोकांनी स्नान घेतले आहे.
प्रयागराजमधील महाकुंभमध्ये सिद्धपुरुषांनी केवळ उपस्थिती न लावता त्यांनी भक्तीत तल्लीन होऊन तिथे भक्तिगीते गायली आणि पारंपारिक विधींमध्येही सहभाग घेतला. एएनआयशी बोलताना महंत सनत कुमार म्हणाले की, “भगवान दत्तात्रेयांच्या गुरु परंपरा पूजेचे आयोजन करण्यात आले होते, त्यानंतर भगवान शिव आणि भगवान गणेशाची आरती आणि भजनही होते. काही विदेशी पाहुणे देखील सहभागी झाले होते, त्यांनी भगवान शिव आणि भगवान राम यांना समर्पित भजन गायले. हे एकतेचे प्रतीक आणि यातून दिसते की, भारतीय आणि पाश्चात्य संस्कृती एकत्र काम करू शकतात.” पुढे ते म्हणाले की, सर्व लोक एकत्र राहू शकतात हा संदेश आहे आणि सनातन धर्माचा अर्थ हाच आहे एकता आणि सहकार्य. या कुंभाच्या पवित्र भूमीतून मी युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षांमध्ये शांततेसाठी प्रार्थना करतो. एक संत म्हणून जगाच्या कल्याणाच्या गरजेवर भर देतो आणि सर्व लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करतो.
भाजप नेते नितीन पटेल यांनीही महाकुंभ २०२५ मध्ये उपस्थिती दर्शवली. यावेळी ते म्हणाले की, “हा महाकुंभ म्हणजे सनात धर्माचे पालन करणाऱ्यांसाठी आणि तमाम भारतीयांसाठी आयुष्यात एकदाच मिळणारी संधी आहे. या महाकुंभाला कोट्यवधी लोक हजेरी लावत आहेत. मी माझ्या कुटुंबासह येथे पवित्र स्नान करणार आहे”.
हे ही वाचा :
दिशा सालीयन प्रकरणी आदित्य ठाकरे अडचणीत, न्यायालयाने सुनावले
पुणे: अवैध मस्जिद-मदरशावर फडणवीस सरकारचा बुलडोझर!
छोटा राजनचा हस्तक डी.के.रावला खंडणीच्या गुन्ह्यात अटक!
उत्तर प्रदेश सरकारचा अंदाज आहे की यावेळी ४५ कोटींहून अधिक लोक महाकुंभला उपस्थित राहतील. दरम्यान, बुधवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराज येथील महाकुंभ त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक आणि इतर कॅबिनेट मंत्री मुख्यमंत्र्यांसोबत होते. आता भाविकांच्या मोठ्या गर्दीच्या अपेक्षेने २९ जानेवारी रोजी येणाऱ्या मौनी अमावस्येच्या तयारीवर अधिकारी लक्ष केंद्रित करत आहेत.