अनेक संशास्पद प्रकरणे अशी असतात, ज्याची चर्चा वर्षोनुवर्ष सुरू असते. परंतु ती धसास काही लागत नाहीत. दळण मात्र सुरू राहते. दिशा सालियन या तरुणीच्या मृत्यूबाबत गेली काही वर्षे हेच सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर आज सुनावणी झाली. या दरम्यान न्यायालयाने ठाकरेंचा उल्लेख चक्क आरोपी म्हणून केला. या प्रकरणाचा निकाल काहीही लागो, परंतु न्यायालय या प्रकरणात आदित्य ठाकरेंना आरोपी
म्हणून पाहते आहे, ही लहान-सहान बाब नाही.
दुसऱ्याच्या नाकातला शेंबुड दाखवून हसण्याचे काम आदित्य ठाकरे कायम करीत असतात. शिवसेनेत अनेक दशके काम करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी जेव्हा ठाकरेंना सोडचिट्ठी दिली त्यानंतर त्यांचा उल्लेख आदित्य ठाकरे सतत मिंधे असा करीत आले. तेच आदित्य ठाकरे गेली चार वर्षे दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा कलंक घेऊन वावरतायत. दिशा सालियान यांच्यावर सामुहिक बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली असून आदित्य ठाकरे याप्रकरणातील मुख्य आरोपी
आहेत, असा ठपका राशीद खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात केलेल्या जनहित याचिकेत ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी न्या. आलोक आराध्ये आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.
या प्रकरणात सुनावणी करताना आपलीही बाजू ऐकली जावी यासाठी आदित्य ठाकरे यांनी न्यायालयात हस्तक्षेप याचिका केली होती. आदित्य ठाकरे या प्रकरणात आरोपी असल्यामुळे त्यांना हस्तक्षेप याचिका करण्याचा कोणताही अधिकार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले. दिशा सालियनचा तथाकथित अपघाती मृत्यू ८ जून २०२० रोजी झाला. राज्यात तेव्हा मविआचे सरकार होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यामुळे हे प्रकरण दडपले गेले, असा आरोप विरोधकांनी केला. महायुती सरकारमधील विद्यमान मंत्री नितेश राणे यात आघाडीवर होते. त्यांनी अनेकदा आदित्य ठाकरे यांच्यावर या प्रकरणात उघड
आरोप केले आहेत. विरोधक या प्रकरणाच्या माध्यमातून राजकारण करतायत असा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला.
लोकांच्या मनात या प्रकरणाबाबत संशय निर्माण होण्याची काही ठोस कारणे आहेत. दिशा सालियनची हत्या झाल्यानंतर सहा दिवसांत सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली. या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध आहे, असा लोकांच्या मनात
संशय आहे. सुशांतला दिशा सालियन प्रकरणातील सत्य माहिती होते, म्हणून त्याला संपवण्यात आले. त्याच्या हत्येला आत्महत्येचा रंग देण्यात आला, अशी थिअरी अनेकांनी मांडली आहे. ८ जूनच्या दिवशी नेमके काय झाले ? हा तपासाचा विषय आहे. दिशाच्या घरी झालेल्या पार्टीत जे लोक उपस्थित होते तेच याबाबत सांगू शकतील.
पोलिसांनी याप्रकरणी तपास केलेला आहे. पार्टी सुरू असताना दिशा एका खोलीत गेली. तिने आतून दरवाजा बंद केला.
काही वेळाने ती गॅलेरीतून खाली कोसळल्याचे उघड झाले. आदित्य ठाकरे यांचे नाव या प्रकरणात घेतले गेल्यानंतर त्यांनी जो काही खुलासा केला त्यामुळे ते अधिक अडचणीत सापडले. दिशाचा मृत्यू झाला त्या दिवशी माझ्या आजोबांचा मृत्यू झाला म्हणून मी हॉस्पिटलमध्ये होतो, असे त्यांनी सांगितले. आदित्य ठाकरे खोटं बोलले होते. कारण त्यांच्या आजोबांचा मृत्यू १४ जून रोजी झाला होता. दिशा घराच्या बाल्कनीतून कोसळली तेव्हा मी तिथे नव्हतो, हे सिद्ध करण्याची खटपट आदीत्य ठाकरेंना करावीशी का वाटली?
आजोबांच्या मृत्यूची ढाल का करावीशी वाटली ? अनेकदा एखाद्या प्रकरणाचे बालंट टाळण्यासाठी दिलेले खुलासे अधिक संशय निर्माण करतात. दिशा प्रकरणात नेमके तेच झालेले आहे. सुशांत सिंहच्या आत्महत्येसंदर्भात तपास करणाऱे बिहार पोलिस तपासासाठी मुंबईत आले तेव्हा कोविडचे निमित्त करून त्यांना क्वारण्टाईन करण्यात आले. आदित्य ठाकरेंचा संबंध नसेल तर महापालिकेला बिहार पोलिसांच्या विरुद्ध हा गनिमी कावा करण्याचे कारण काय होते? सुशांत प्रकरणाचा तपास बिहार पोलिसांनी केला काय किंवा इंटरपोलने केला काय, शून्य फरक पडतो. तुमचा संबंध नसेल तर तुम्हाला सत्तेचा वापर करून तपासात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न का झाला? अशा प्रकारच्या घटनांची मालिका आहे. त्यामुळे या प्रकरणात सरकार आणि आदित्य ठाकरे काही लपवण्याचा प्रयत्न करतायत, खोटे बोलून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत, असा लोकांचा समज झाला. दिशाच्या मृत्यूनंतर तिचा होणारा नवरा बराच काळ गायब होता. त्याचा ठावठिकाणाही कोणाला ठाऊक नव्हता. ही बाब सुद्धा संशयास्पदच आहे.
हे ही वाचा:
‘राष्ट्रग्रंथ : आधारस्तंभ लोकशाहीचा’ प्रयोगाचा शुभारंभ २६ जानेवारीला
छोटा राजनचा हस्तक डी.के.रावला खंडणीच्या गुन्ह्यात अटक!
अरविंद केजरीवाल यमुनेत स्नान करणार का?
कपिल शर्मा, राजपाल यादवसह चार कलाकारांना बिष्णोईच्या नावे धमकीचा मेल
एडवोकेट राशीदखान पठाण आणि नीलेश ओझा यांनी जेव्हा याप्रकरणात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली तेव्हा याप्रकरणात आदित्य ठाकरे यांना हस्तक्षेप याचिका दाखल करण्याचे कारण काय होते, हा प्रश्न सुद्धा अनुत्तरीत आहे.
आरोपी असल्यामुळे याप्रकरणात हस्तक्षेप याचिका करण्याचा तुम्हाला अधिकार नाही या शब्दात न्यायालयाने ठाकरे यांना फटकारल्याची माहिती एडवोकेट नीलेश ओझा यांनी दिलेली आहे. त्यांच्या वकीलांनाही पुढच्या सुनावणीच्या वेळी तयारी करून आपली बाजू मांडा अशा कानपिचक्या दिलेल्या आहेत.
दिशा सालियानचा मृत्यू आणि सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या या दोन्ही प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला. त्यावेळी सत्ता मविआची होती. आदित्य ठाकरे मंत्री होते. त्यांचे पिताश्री मुख्यमंत्री होते. त्यामुळे हा तपास नि:पक्षपातीपणे झाला असेल याबाबत साशंकता आहेच. दिशा आणि सुशांत प्रकरणी जर तेव्हा तपास झाला नसेल तर आतापर्यंत किती पुरावे शिल्लक असतील, हा सवाल आहेच. महायुती सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली होती. तो तपास नेमका कुठपर्यंत आला, याबाबत जनता अद्याप अंधारात आहे.
महायुती सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यानंतर आदित्य ठाकरे एका महिन्यात त्यांना तीनदा भेटले. त्याचा संबंध सुद्धा लोकांनी दिशा सालियन प्रकरणाशी जोडला. सत्य कुठे तर दडलेले आहे. ते समोर यावे अशी लाखो लोकांची इच्छा आहे. परंतु ते बाहेर येईलच याबाबत कुणालाही खात्री नाही. सगळेच अंधारात तीर चालवतायत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)