दिल्लीच्या निवडणूक निकालांवर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया देताना ‘आप’चा चांगलाच समाचार घेतला आहे. दारूवर लक्ष केंद्रित केल्यामुळेच ‘आप’चा पराभव झाल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “मी आधीच सांगितलं होतं की, निवडणूक लढताना उमेदवारामध्ये आचरण, विचार शुद्ध असणे, जीवन निष्कलंक असणे, जीवनात त्याग असणे हे गुण जर असतील तर मतदारांना विश्वास वाटतो की आपल्यासाठी कोणीतरी करणारा आहे. मी वेळोवेळी सांगत आलो पण त्यांच्या डोक्यात ते आलं नाही. त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही आणि शेवटी, त्यांनी दारूवर लक्ष केंद्रित केले. ते पैशाच्या ताकदीने भारावून गेले होते,” अशी टीका अण्णा हजारे यांनी केली.
“दारूच्या बाबतीत केजरीवाल यांनी एक मुद्दा उपस्थित केला. दारूचे दुकान. हा दारूचा मुद्दा का उपस्थित झाला तर पैसा आणि संपत्ती यामुळे आणि यातच ते वाहून गेले,” अशी टीका करत अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला.
हे ही वाचा:
दिल्ली निवडणुकीत काँग्रेस, आप एकत्र राहिले असते तर बरे झाले असते
दिल्लीत आप, काँग्रेसची परिस्थिती पाहून ओमर अब्दुल्लांची खोचक पोस्ट!
१८३ पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात हमास तीन ओलिसांची सुटका करणार
रडारवरून गायब झालेल्या अलास्कातील विमानाचे अवशेष सापडले; तीन मृतदेह आढळले
“राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात. आरोप होत असतील तर ते कसे खोटे आहेत, ते जनतेसमोर मांडावे लागतात. हे जेव्हा माझ्याबरोबर आले त्यावेळेला मी त्यांना सुरूवातीपासून सांगत आलो की जनतेची सेवा करा. फळाची अपेक्षा न करता केलेलं कर्म ही ईश्वराची पूजा असते, अशी पूजा तुम्ही करत रहा तुम्हाला कोणी हटवणार नाही. नंतर यांच्या डोक्यात दारूचे दुकान शिरले. दारू डोळ्यासमोर आली की पैसा, धन, दौलत आली मग सगळं बिघडलं आणि त्यामुळे जनतेने त्यांना जो कौल दिला तो बरोबर दिला. असे वागत असलेले लोक सत्तेवर आले तर देश, दिल्ली बरबाद होईल म्हणून त्यांना नकार दिला,” अशी टीका अण्णा हजारे यांनी केली आहे.