इस्रायल आणि हमास यांच्यातील १५ महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धाला अखेर युद्धविराम मिळाला असून या कराराअंतर्गत हमासकडून ओलिसांची सुटका केली जात आहे तर इस्रायलकडून काही कैद्यांची सुटका केली जात आहे. अशातच पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात शनिवारी सोडण्यात येणाऱ्या तीन इस्रायली ओलिसांची नावे हमासने शुक्रवारी जाहीर केली आहेत.
७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने केलेल्या हल्ल्यात किबुत्झ बेअरी येथून ओलिस ठेवण्यात आलेले ओहाद बेन अमीअन आणि एली शराबी आणि त्याच दिवशी नोव्हा संगीत महोत्सवातून अपहरण झालेले ऑर लेव्ही यांना शनिवारी सुपूर्द केले जाईल, असे हमासने म्हटले आहे. हमास कैद्यांच्या मीडिया ऑफिसने सांगितले की, इस्रायलकडून त्या बदल्यात १८३ पॅलेस्टिनींना मुक्त करण्याची अपेक्षा होती, ज्यात १८ जण जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत, ५४ जण दीर्घकाळ शिक्षा भोगत आहेत आणि १११ जण युद्धादरम्यान गाझा पट्टीत ताब्यात घेण्यात आले होते.
तत्पूर्वी, पॅलेस्टिनी दहशतवादी गटाने इस्रायलवर युद्धबंदी कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आणि दुपारी ४ ची अंतिम मुदत संपेपर्यंत तीन इस्रायलींची नावे जाहीर करण्यास टाळाटाळ केली. १९ जानेवारी रोजी झालेल्या युद्धविराम करारांतर्गत अन्न आणि इतर मानवीय साहित्य वाहून नेणाऱ्या शेकडो ट्रकच्या प्रवेशास इस्रायलने विलंब केल्याचा आणि बॉम्बस्फोट झालेल्या घरांमध्ये परतणाऱ्या लोकांना आश्रय देण्यासाठी आवश्यक असलेल्या तंबू आणि मोबाइल होम्सचा काही भाग वगळता सर्व काही रोखल्याचा आरोप हमासने केला. तर, गाझामध्ये मदत पोहोचवण्याचे काम पाहणारी इस्रायली लष्करी संस्था COGAT ने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
हे ही वाचा:
दिल्लीचे तख्त कोण राखणार? सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाची मुसंडी
रडारवरून गायब झालेल्या अलास्कातील विमानाचे अवशेष सापडले; तीन मृतदेह आढळले
पंतप्रधान मोदी १२, १३ फेब्रुवारी रोजी अमेरिका दौऱ्यावर जाणार!
काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा अमेरिकेच्या ताब्यात येईल आणि त्याचा विकास केला जाईल अशी घोषणा केली. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गाझासाठी ट्रम्पच्या दृष्टिकोनाला उल्लेखनीय योजना म्हणून मान्यता दिली, परंतु अरब देशांनी, हमास आणि पॅलेस्टिनी प्राधिकरणासह पॅलेस्टिनी गटांनी आणि गाझाच्या अनेक लोकांनी याला विरोध केला आहे.
हमास दहशतवादी संघटनेने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हल्ला केला. ज्यामध्ये सुमारे १,२०० लोक मारले गेले आणि २५० हून अधिक लोकांना ओलिस म्हणून ताब्यात घेतले. प्रत्युत्तरादाखल, इस्रायलने गाझामध्ये हवाई आणि जमिनीवरील युद्ध सुरू केले. ज्यामध्ये गाझा आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ४७,००० हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत.