“भारतातील मुस्लिम तरुणांचा आवाज मुद्दाम दाबला जात आहे. त्यांना तुरुंगात टाकले जात आहे कारण ते भविष्यातील नेते आहेत. ते शिक्षित आहेत, त्यांचा एक विचार आहे आणि हो, ते मुस्लिम आहेत म्हणूनच सरकार त्यांना घाबरते,”असा जावईशोध देखील त्यांनी लावला. यापुढे जाऊन ते म्हणाले, “कोणताही माणूस बेकायदा नसतो. शरणार्थींना येवू द्या.”
या कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मदन लोकूर, पाटणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश इक्बाल अन्सारी, वरिष्ठ वकील कॉलिन गोन्साल्विस, प्रशांत भूषण, संजय हेगडे, वरीशा फरासत, शाहरुख आलम (मॉडरेटर), नित्या रामकृष्णन, माजी आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन यांचाही समावेश होता.
प्रस्थापित माध्यमांनी या वक्तव्यांकडे बव्हंशी दुर्लक्ष केले असले तरी सिनेनट प्रकाशराज यांच्या या वक्तव्यांना डाव्या परिसंस्थेतील माध्यमांनी प्रसिद्धी दिली. त्यामुळे समाजमाध्यमांवर नव्याने वाद सुरू झाला असून, संतप्त नेटकऱ्यांनी त्यांच्यावर तणाव निर्माण करणारी भडकाऊ विधाने केल्याचा आरोप केला आहे. कोणताही माणूस बेकायदेशीर नसल्यामुळे प्रकाशराज अनोळखी लोकांना त्यांच्या घरात बसू देतील का? असा प्रश्नही नेटिझन्सनी विचारला आहे.
मुळातच अशी विधाने करून सवंग प्रसिद्धी मिळवण्याची प्रकाशराज यांची जुनीच खोड आहे. वस्तुतः बांगलादेश, पाकिस्तान, चीन यासारख्या कुरापतखोर देशांशी १५,००० किमी लांब सीमा असलेल्या भारतासारख्या देशात बेकायदेशीर स्थलांतर हे आर्थिक समस्या, दहशतवाद, गुन्हेगारी आणि सामाजिक अस्थिरतेचे साधन ठरते, हे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेससारख्या अनेक संस्थांनी केलेल्या अभ्यासांमध्ये सिद्ध झालेले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २०२५ मध्ये सांगितले की, ड्रग्स, शस्त्रास्त्र आणि हवाला यासारख्या अवैध कृत्यांमध्ये सहभागी असलेली बेकायदेशीर स्थलांतर कार्टेल्स संपवण्यासाठी कायदे आवश्यक आहेत.
परदेशी नागरिकांनी कायदेशीर बाबींची पूर्तता न करता देशात प्रवेश करणे हा कायद्याने दंडनीय अपराध ठरवला आहे. बांगलादेश आणि म्यानमारमधून दरवर्षी भारतात लाखो माणसांचे बेकायदेशीर स्थलांतर होते. त्यामुळे आसाम, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालसारख्या सीमावर्ती राज्यांमधील लोकसंख्येचा समतोल ढासळत असून सीमा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बांगलादेशी बेकायदेशीर स्थलांतरकर्ते “भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठी धोका” आणि “देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान” असल्याचा निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयाने देखील दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश राज यांचे “कोणताही मानव बेकायदेशीर नाही” हे घुसखोरीचे समर्थन करणारे विधान अतार्किक आणि राष्ट्रहित विरोधी ठरते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, बेकायदेशीर स्थलांतर “लोकसांख्यिक बदल” घडवते. त्यामुळे आसाम, त्रिपुरा यासारख्या सीमावर्ती भागातील स्थानिक संस्कृती आणि अर्थव्यवस्था धोक्यात येते. हे स्थलांतर “सुनियोजित मोहीम” आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका उत्पन्न होत आहे.”
प्रकाशराज यांनी विधाने केली त्या कार्यक्रमात रोहिंग्या घुसखोरांची देशातून हकालपट्टी करण्याला न्यायालयात आणि त्याबाहेर देखील विरोध करणाऱ्या प्रशांत भूषण, कॉलिन गोन्साल्विस यासारख्या लोकांची उपस्थिती होती. तथापि, प्रकाशराज यांची विधाने न्यायालयीन मार्गाचा अवलंब करण्याऐवजी संघर्षावर भर देतात. त्यामुळे डाव्या परिसंस्थेतील लोकांची न्यायालयीन आणि लोकशाही मार्गांवर विश्वास नसल्याचे स्पष्ट होते.
हे ही वाचा:
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू म्हणतो, “भारत माझी मातृभूमी!”
कफ सिरप सेवनामुळे लहान मुलांच्या मृत्युनंतर औषध नियंत्रक निलंबित
धर्मांतर प्रकरणी अमेरिकन नागरिकासह तीन जणांना अटक
मटणाच्या रांगेत राहुल गांधींची शाकाहारावर चर्चा
भारतात लोकशाही मार्गाने विद्यमान केंद्र सरकारचा पराभव करता येत नाही, हे २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर सिद्ध झाले आहे. त्यामुळेच देशात एकाच वेळी विविध ठिकाणी अराजक निर्माण करण्याची नवी रणनीती देशविघातक शक्ती आखत आहेत. लोकशाही प्रक्रियेत प्रश्न सोडवण्यासाठी संवाद हा एकमेव मार्ग आहे. सरकार त्यासाठी प्रयत्नरत आहे.
राहुल गांधी किंवा डाव्या परिसंस्थेतील त्यांच्या पाठीराख्यांना वास्तव आणि सत्य यांचे काहीही सोयरसुतक नाही. सत्तेसाठी कसेही करून मोदी यांना बदनाम करायचे, त्यासाठी लष्करासह न्यायपालिका, तपास यंत्रणा, निवडणूक आयोग वगैरे महत्त्वाच्या संस्थांच्या विश्वासार्हतेबद्दल शंका उपस्थित करायची आणि देशात संभ्रम आणि अराजकतेचे वातावरण निर्माण करायचे, या हेतूने ते सातत्याने काम करत आहेत. बांगलादेश, नेपाळमध्ये जसा हिंसाचार होऊन सत्तापालट झाला तसाच भारतातही होईल, या आशेवर ही मंडळी आहेत. संवैधानिक संस्थांबाबत संशय निर्माण केल्यास लोकांचा आपल्या असत्यवचनांवर विश्वास बसेल, अशी त्यांची समजूत आहे. मात्र, ‘ये पब्लिक हैं, ये सब जानती हैं’ ही केवळ एका चित्रपटातील गाण्याची ओळ नाही, तर ती वस्तुस्थिती आहे. जनता सर्व जाणून आहे आणि योग्य वेळ येताच ती आपल्या निर्णयाचा प्रहार करते हे प्रकाशराज आणि नट म्हणून त्यांना मिळत असलेली लोकप्रियता आणि त्यांच्या प्रसिद्धीलोलुपतेचा फायदा घेणाऱ्या डाव्या परिसंस्थेतील यांनी लक्षात ठेवावे.







