काँग्रेस खासदार प्रियांका वाड्रा या ‘पॅलेस्टाईन’ लिहिलेली बॅग घेऊन सोमवार, १६ डिसेंबर रोजी संसदेत पोहचल्या होत्या. यावरून राजकीय वातावरण तापले होते. भाजपाने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. यानंतर मंगळवार, १७ डिसेंबर रोजी प्रियांका गांधी यांनी संसदेत आणलेली त्यांची बॅग पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रियांका वाड्रा या बांगलादेशमधील हिंदू आणि ख्रिश्चनांच्या पाठीशी उभे असल्याचा संदेश असलेली बॅग मंगळवारी संसदेत घेऊन आल्या होत्या.
“आम्ही बांगलादेशातील हिंदू आणि ख्रिश्चनांच्या पाठीशी उभे आहोत” असे लिहिलेली बॅग घेऊन प्रियांका गांधी संसदेत आल्या. याशिवाय त्या खांद्यावर ही बॅग घेऊन प्रियंका वाड्रा मंगळवारी संसदेच्या आवारात बांगलादेशात हिंदू आणि ख्रिश्चनांवर झालेल्या अत्याचाराविरोधात काँग्रेस खासदारांच्या निषेधाचे नेतृत्व करताना दिसल्या. इतर खासदारांच्या हातातही अशाच बॅग दिसून आल्या. बांगलादेशात हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दा सरकारने उपस्थित केला पाहिजे. याबाबत बांगलादेश सरकारशी चर्चा करावी आणि ज्यांना वेदना होत आहेत त्यांना आधार द्यावा, असं मत प्रियांका यांनी मांडले.
यापूर्वी प्रियांका वाड्रा या ‘पॅलेस्टाईन’ लिहिलेली बॅग घेऊन सोमवारी संसदेत पोहोचल्या होत्या. त्यावर पॅलेस्टिनी एकतेचे प्रतीक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या टरबूजाचेही चित्र होते. काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी प्रियांका वाड्रा यांची बॅग दाखविल्याचे चित्र शेअर केले होते आणि म्हटले होते की, “प्रियांका गांधी जी त्यांच्या समर्थनाचे प्रतीक असलेली एक विशेष बॅग घेऊन पॅलेस्टाईनशी एकता दर्शवित आहेत. करुणा, न्याय आणि मानवतेची वचनबद्धता!”
प्रियांका यांनी केलेल्या कृतीसाठी त्यांच्यावर पाकिस्तानातून स्तुतिसुमने उधळली गेली. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानचे काँग्रेस प्रेम समोर आल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद हसन चौधरी यांनी थेट प्रियंका गांधींचा ‘पॅलेस्टाईन’ लिहिलेली बॅग घेऊन असलेला फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे. शिवाय त्यांचे कौतुकही केले आहे.
हे ही वाचा :
कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांना पक्षातले लोक कंटाळले; अर्थमंत्र्यांचा राजीनामा
संभल येथे सापडलेल्या मंदिरामागील अनधिकृत बांधकाम पाडायला सुरुवात
‘पॅलेस्टाईन’ बॅग घेणाऱ्या प्रियांका वाड्रांवर पाकिस्तान खुश!
ईव्हीएमच्या मुद्द्यावरून ओमर अब्दुल्लानंतर तृणमूलही काँग्रेसविरोधात
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते संबित पात्रा यांनी ‘पॅलेस्टाईन समर्थक हावभाव’ बद्दल वाड्रा यांच्यावर जोरदार टीका केली आणि ते म्हणाले, “जिथपर्यंत गांधी कुटुंबातील सदस्यांचा प्रश्न आहे, तो काही नवीन नाही. अगदी नेहरूंपासून प्रियंका वड्रापर्यंतचे सदस्य. गांधी परिवार तुष्टीकरणाची झोळी घेऊन फिरतो. त्यांनी कधीच देशभक्तीची पिशवी खांद्यावर टांगलेली नाही. त्यांच्या पराभवामागे हे सामान कारण आहे, असे ते म्हणाले.