29 C
Mumbai
Thursday, August 18, 2022
घरराजकारणफसलेला डाव आणि पवारांचा थयथयाट...

फसलेला डाव आणि पवारांचा थयथयाट…

Related

एकनाथ शिंदे यांचे बंड हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याची भूमिका खुंटीला टांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्यासाठी कंबर कसली आहे. महाराष्ट्रात हे तीन पक्षांचे सरकार स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस हा त्याचा सर्वाधिक लाभार्थी असलेला पक्ष आहे. अर्थमंत्रालय आणि गृहमंत्रालय ही दोन महत्वाची खाती स्वत:कडे ठेवून पवारांनी मुख्यमंत्री पदाचा खुळखुळा काडीचा अनुभव नसलेल्या उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला होता. मुखवटा शिवसेनेचा असला तरी सरकारवर पकड पवारांचीच होती. मुख्यमंत्री आणि शिवसेना फक्त लोकांच्या टीकेचे धनी होते.

एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले आमदार नेमकी हीच खदखद वारंवार व्यक्त करीत आहेत. गुजरात आणि आसाममध्ये ठिक आहे, पण विधानसभेत भाजपा नेते मार्गदर्शन कसे करतील? बंडखोरांना परीणाम भोगावेच लागतील, असा इशारा पवारांनी शिंदे समर्थक आमदारांना दिला आहे.

बंडखोरीबद्दल पवार बोलतायत हा सगळ्यात मोठा विनोद. पवार हे बंडखोरीचे महामेरु आहेत. त्यांची हयात बंडखोरी करण्यातच गेली. त्याचे परिणाम पवारांनी कधी भोगले? काँग्रेस फोडून त्यांनी पुलोदची स्थापना केली. पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. १९९९ मध्ये पुन्हा काँग्रेस फोडली, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. विदेशी नागरिकत्वाच्या मुद्यावरून सोनिया गांधी यांच्यावर तोफा डागल्या. त्यानंतर केवळ एका वर्षात कोलांटी मारुन पवार यांनी सोनिया गांधी पंतप्रधान बनायला आपला कोणताही विरोध नाही अशी कोलांटी मारली. त्यामुळे बंडखोरी आणि कोलांट्या मारून पवारांनी त्यांची कारकिर्द घडवली, बहरवली. तेच पवार आता बंडखोरीच्या परीणामांबाबत बोलतायत.

छगन भुजबळ शिवसेनेतून १७ आमदार घेऊन फुटले, त्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्यांच्यापैकी फक्त एक आमदार निवडून आल्याची आठवण पवार यांनी करून दिली. शिंदेसोबत गेलेल्या आमदारांची सुद्धा हीच अवस्था होईल असा गर्भित इशारा पवारांनी दिलेला आहे. पवारांच्या या इशाऱ्यानंतर त्यांचा हस्तक मीडियाही कामाला लागला. झी २४ तासने बंडखोर आमदारांच्या मतदार संघातील जनतेचे मत घेतले, यातला प्रत्येक माणूस शिवसेनेसाठी हळहळत होता, उद्धव ठाकरे यांची बाजू घेत होता आणि बंडखोरांना माफ करणार नाही अशी भाषा करत होता.

कोण विश्वास ठेवेल या ‘पीआर’वर? गेली अडीच वर्षे ठाकरे सरकारचा भ्रष्टाचार, दंडेली आणि कुचकामी कारभारामुळे रसातळाला जात असलेल्या राज्य कारभारावर मराठी मीडिया डोळ्यावर कातडे ओढून बसला होता. इमाने इतबारे ठाकरे सरकारचा पीआर करण्याचे काम करत होता. आता ठाकरे सरकार अखेरच्या घटका मोजत असताना मीडिया तेवढ्याच इमानीपणे मीठाला जागतो आहे. डॅमेज कंट्रोलसाठी जमेल तेवढी मदत करतो आहे.

पवार फक्त सोयीचा इतिहास सांगणारे इतिहातज्ज्ञ आहेत. भुजबळांचा इतिहास त्यांनी सांगितला, पण नारायण राणे यांचा इतिहास सांगण्याचे टाळले. शिवसेनेतून नारायण राणे यांनी बंड केले होते. १०-१२ आमदारांसोबत काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यापैकी राणेंसह अनेक आमदार जिंकून आले होते. त्यामुळे पवारांनी सत्याचा अपलाप करण्याचा प्रयत्न करू नये. ते समजतात तितकी जनता मूर्ख नाही. किमान बंडखोरी आणि त्याच्या परिणामांबाबत बोलताना जरा स्वत:चा इतिहास तपासावा.

हे ही वाचा:

शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीची मोठी कारवाई

‘माझे मुख्यमंत्रीपद मान्य नसणे ही राक्षसी महत्त्वाकांक्षा’

‘आमदार माझ्या पार्टीचे नाहीत, त्यामुळे सल्ला देणार नाही’

एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा गेम कुणाचा???

 

गेली अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारने उत्तम काम केले असल्याचे सांगून पवारांनी काल पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांसह स्वत:ची पाठही थोपटून घेतली. बहुमताचा फैसला गुवाहाटीच्या हॉटेलात नाही सभागृहातच होणार असे शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना सुनावले. बंडखोरीचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा सज्जड दम दिला. सभागृहात येऊन दाखवा, असे आव्हानही दिले. त्यांनी बंडखोरांना इशारे दिल्यानंतर त्याची तळी उचलणाऱ्या मीडियाकडून त्याचे पोस्टमॉर्टम अपेक्षित नाही. परंतु नारायण राणे यांच्यासारखा आक्रमक नेता कसा गप्प बसेल?

ज्यांना पवारांचे गर्भित इशारे धमकीवजा वाटले नाहीत, त्या पत्रकारांनी राणे यांची धमकी अशा बातम्या मात्र ईमानेइतबारे रंगवल्या. राणे यांची भाषा आक्रमक होती, पण त्यांनी जर तरचा वापर केला. जर असे झाले तर तसे होईल… असे ते म्हणाले आहेत. जर आमदारांच्या केसालाही धक्का लागला, तर घरी जाणे कठीण होईल, असा इशारा राणे यांनी दिला आहे. याचा अर्थ महाविकास आघाडीचे नेते शिंदे समर्थक आमदारांना दगाफटका करतील अशी भीती राणे यांनी व्यक्त केली आहे.

राज्यात तसा माहोल बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे घडले तर त्याचे परीणाम झाल्याशिवाय कसे राहतील? दोन दिवस शांत बसलेले पवार आता इतके सक्रीय का झाले, एकाच दिवसात काल त्यांनी दोन पत्रकार परीषदा का घेतल्या याचे उत्तर शोधण्याची गरज आहेत. पवारांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरीष्ठ नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार हे या संपूर्ण घडामोडींपासून अलिप्त आहेत. शिवसेना फुटण्यामागे भाजपाची काही भूमिका आहे, असे आपल्याला वाटत नाही, असे वक्तव्य करून त्यांनी महाविकास आघाडीला झटका दिला आहे. एका बाजूला शरद पवार हे एकनाथ शिंदे यांच्या बंडाला भाजपाला जबाबदार धरत असताना अजित पवार यांनी घेतलेली भूमिका अनेकांच्या भुवया उंचावून गेली आहे.

अजित पवार जे म्हणाले ते पवारांच्या कानीही आले असेल. त्यामुळे जे शिवसेनेत होते आहे, ती आग उद्या राष्ट्रवादीमध्ये पसरायला वेळ लागणार नाही हे पवारांना ठाऊक आहे. देहूमध्ये संत तुकाराम शिळास्मारकाचे लोकार्पण करायला आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारांच्या खांद्यावर दोनदा हात टाकला, त्यांना सोबत हेलिकॉप्टरमधून ते मुंबईला घेऊन आले. ही दृष्य त्यांना वारंवार स्वप्नातही दिसतात म्हणे.

अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारने उत्तम कामं केली, अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले असे असताना हा फसलेला डाव आहे, असे ज्यांना वाटते त्यांचे ते राजकीय अज्ञान आहे, असे पवार म्हणाले आहेत. पवारांचा डाव फसलाही आहे आणि अर्ध्यावर संपलाही आहे. गुवाहाटीत बसून फैसला होणार नाही, त्यासाठी आमदारांना एकतर राजभवनात किंवा सभागृहात यावे लागेल असे पवार काल म्हणाले. पवारांचे आव्हान एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात पवार यांनी अनेक वर्षे महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना डावलून महाराष्ट्राचे राजकारण शक्य नव्हते. वयाच्या ८० वर्षात ते ठाकरे सरकारचे मार्गदर्शक आणि रिमोट कंट्रोल बनले. गेल्या अडीच वर्षात त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची अनेकदा खिल्ली उडवली होती. ते म्हणाले होते कि मी परत येईन, परंतु मी त्यांना परत येऊ दिले नाही… हा टोला पवारांनी वारंवार लगावला. पण अडीच वर्षांनी का होईना फडणवीस परत येतील अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात पवारांच्या वाट्याला एक मोठा पराभव येतो आहे. सत्ता गेली आणि पक्षाचीही वाताहत झाली हे पाहणे जसे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला आले तसे ते आता पवारांच्या वाट्यालाही येण्याची शक्यता आहे, त्यामुळेच पवार बिथरलेले आहेत.

 

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,912चाहतेआवड दर्शवा
1,918अनुयायीअनुकरण करा
23,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा