राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना अखेर राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. मंगळवार, २० मे रोजी छगन भुजबळ यांनी राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी त्यांना देण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात सुरुवातील छगन भुजबळांना स्थान मिळालं नव्हतं. त्यामुळे छगन भुजबळ नाराज होते. मंत्रिपद न मिळाल्याची खंत त्यांनी अनेकदा व्यक्त केली होती. अजित पवारांनी मंत्रिपदाची संधी न दिल्यानंतर छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेतली होती. त्यावेळी फडणवीसांनी भुजबळांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला होता.
छगन भुजबळ म्हणाले की, “मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांचे आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचेही आभार मानतो. सगळं आठ दिवसांपूर्वीच ठरलं आहे. त्यानंतर आता शपथविधी होतो आहे. ज्याचा शेवट चांगला ते सगळं चांगलं,” असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. तर, शपथविधी पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देतील त्या खात्याची जबाबदारी पार पाडणार अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
तुर्कीयेच्या सेलेबी कंपनीचा परवाना का रद्द केला? भारत सरकारने स्पष्ट केलं कारण
“अमेरिका दहशतवाद्याला भारताच्या ताब्यात देऊ शकते, तर पाकिस्तान का नाही?”
छगन भुजबळ मंत्री होणार, आज शपथविधी
त्रिकोणाचा चौथा कोन: राहुल गांधी
दरम्यान, बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात महायुतीचे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. मुंडे यांची हकालपट्टी झाल्यानंतर त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा होती. भुजबळ यांना या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे ते नाराज होते, पण अखेर त्यांची प्रतीक्षा संपली आहे. रिक्त मंत्रिपद आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना देण्यात आले आहे. आधीच्या मविआ सरकारमध्ये छगन भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा हे खातं होतं. नंतर ते खातं धनंजय मुंडे यांच्याकडे गेलं. आता तेच खातं पुन्हा एकदा भुजबळ यांच्याकडे येण्याची शक्यता आहे.
