राज्य मार्ग परिवहनच्या बँकेत जोरदार हाणामारी घडल्याचे वृत्त आहे. गुणरत्न सदावर्ते आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटातील अडसूळ यांच्या कार्यकर्त्यांत हा संघर्ष झालेला आहे. त्यात चार पाच संचालक जखमी झालेले आहेत. नागपाडा पोलिस ठाण्यात यासंदर्भात आता तक्रारी दाखल झाल्या आहेत.
दिवाळी बोनस वाटपाच्या चर्चेसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते पण त्यावरून या दोन्ही गटात मतभेद झाले आणि त्याचे पुढे हाणामारीत रूपांतर झाले. एसटी बँकेच्या संचालकांच्या या बैठकीत बाहेरूनही माणसे आली असल्याचा संशय व्यक्त होत असून त्यांचा या हाणामारीत सहभाग असल्याचा आरोप अडसूळ गटाकडून केला जात आहे.
सदावर्ते गटाकडून या बँकेमध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप अडसूळ गटाकडून करण्यात आल्यानंतर त्याचे या राड्यात रूपांतर झाल्याचे सांगण्यात येते.
हे ही वाचा:
रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करा
गाझा शांतता शिखर परिषदेत ट्रम्प यांचे कौतुक करणारे शरीफ बनले टीकेचे धनी
६१ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण एक मोठा टप्पा
अंसारी अलीमुद्दीन, नफीस यांच्या घरांवर ईडीची छापेमारी
याबाबत माजी खासदार आनंदराव अडसूळ म्हणाले की, ही बँक आता कर्मचाऱ्यांना, सदस्यांना सुरक्षित वाटत नाही, कारण या बँकेमध्ये सदावर्तेंनी भ्रष्टाचार, गैरव्यवहार केला. या बँकेत १२५ कर्मचाऱ्यांची भरती पैसे देऊन करण्यात आली. बँकेच्या १२ कोटींच्या सॉफ्टवेअरसाठी ५२ कोटींचा खर्च सदावर्ते गटाने केलेला आहे. टीव्हीवर या हाणामारीची चित्र दिसत असून एकमेकांवर काही वस्तू फेकून मारल्याचे दिसत आहेत.
या आगोदर एसटी बँकेच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची हाणामारीची घटना घडली नाही. एसटी को-ऑपरेटिव्ह बँक ही एसटी कर्मचाऱ्यांच्या घामाच्या पैशावर चालणारी आशिया खंडातील सगळ्यात मोठी को-ऑपरेटिव्ह बँक म्हणून ओळखली जाते. परंतु गेल्या काही दिवसात या बँकेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळेच या बँकेतून मोठ्या प्रमाणात ठेवीही काढण्यात येत असल्याची माहिती आहे.







