29 C
Mumbai
Sunday, August 7, 2022
घरराजकारणअडीच वर्षे वरवंटा फिरवून उद्धव ठाकरे पुन्हा सुसंस्कृतपणाच्या कोशात

अडीच वर्षे वरवंटा फिरवून उद्धव ठाकरे पुन्हा सुसंस्कृतपणाच्या कोशात

Related

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल बुधवारी फेसबुक लाईव्हवर जनतेशी संवाद साधताना राजीनामा दिला. मंत्रिमंडळ बैठकीत मित्रपक्षांचे आभार मानून त्यांनी याचे संकेत दिले होते. अडीच वर्षाच्या कारभारानंतर उद्धव ठाकरे यांची ही एक्झिट सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अपेक्षितच होती. यानंतर मराठी माध्यमांना उद्धव ठाकरेंचा प्रचंड कळवळा आल्याचे चित्र दिसते. ही पीआर कंपन्यांची कृपा कि ऊतू जाणारे प्रेम.

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पदाचा त्याग केला, महाराष्ट्राचे डोळे पाणावले, शिवसैनिक हेलावले असे मथळे सजवून माध्यमांकडून या घटनाक्रमाला भावनिक मुलामा देण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे २००४ मध्ये सोनिया गांधी यांनी केलेल्या पंतप्रधान पदाच्या ‘त्यागा’ची आठवण झाली.

तेव्हाही सोनिया गांधी पंतप्रधान बनण्यासाठी प्रचंड इच्छुक होत्या. पण घटनात्मक तरतूदीनुसार जन्माने विदेशी असलेली व्यक्ती पंतप्रधान बनू शकत नाही, असे उघड झाल्यावर त्यांनी डॉ. मनमोहन सिंह यांना उभे केले. गांधीनिष्ट मीडियाने याला त्यागाचा मुलामा दिला. सोनिया गांधी जणू सर्वसंगपरीत्याग केलेल्या संन्यासिनी आहेत, असे वातावरण निर्माण केले. तोच प्रकार उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर सुरू आहे.

समाज माध्यमांच्या जमान्यात लोकांना मूर्ख बनवणे सोपे राहिलेले नाही हे अजून मुख्य प्रवाहातील मीडियाला लक्षात येत नाही की, लोण्याचे गोळे सोडण्याची तयारी नसल्यामुळे ही लाचारी सोडवत नाही, असा प्रश्न आहे. पक्षाचे ३५ पेक्षा जास्त आमदार आणि ठाकरे सरकारला समर्थन देणारे अपक्ष आमदार जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या सोबत बाजूला झाले तेव्हा जर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला असता, तर त्यांची थोडीफार तरी पत शिल्लक राहीली असती, परंतु खुर्चीचा मोह नाही असा दावा करत ते खुर्ची धरून राहिले.

एकनाथ शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र करून सत्ता टिकवण्याच्या लटपटी करू लागले. अभिषेक मनू सिंघवी यांच्यासारखा महागडा वकील देऊन त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू भक्कमपणे मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु डाळ शिजली नाही. बहुमत चाचणी होणारच असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर खुर्ची सोडावी लागणार हे स्पष्ट झाले. तेव्हा मुख्यमंत्री भावनिक आवाहन करण्यासाठी लोकांसमोर आले.

केंद्राने पाठवलेल्या सीआरपीएफच्या तुकड्यांवर त्यांनी टोमणेबाजी केली. ज्या शिवसैनिकांनी आमदारांच्या विजयानंतर बेहोशीने गुलाल उधळला त्यांच्या रक्ताने तुम्ही मुंबईचे रस्ते लाल करणार आहात का? असा सवाल विचारलाय. ही परीस्थिती कुणी आणली? उद्धव ठाकरे माणूस की ची भाषा करतायत. ‘चाळीस प्रेतं येतायत, त्यांना पोस्टमॉर्टमसाठी पाठवू’, असे माणूसकी ने ओतप्रोत वक्तव्य त्यांचेचे लाडके प्रवक्ते संजय राऊतांनी केले. युवराज ‘एअरपोर्टवरून जाणारा रस्ता वरळीवरून जातो’ अशी प्रेमळ वक्तव्य करत होती, तेव्हा कुठे गेली होती माणूसकी.

अडीच वर्षात विरोधकांवर वरवंटा चालवणारे मुख्यमंत्री, सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्या समीत ठक्कर, जयसिंग मोहन, सुनैयना होले, निखील भामरे, केतकी चितळे अशा अनेकांना पोलिस बळाचा वापर करून दडपणारे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील एक मंत्री एका समीर वानखेडे यांच्यासारख्या इमानदार अधिकाऱ्याच्या कुटुंबियांचे वाभाडे काढत असताना त्याच्या पाठीवर गुड गोईंग… अशी थाप देणारे मुख्यमंत्री, भाजपा कार्यकर्त्यांना झुंडीने मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांचा मातोश्रीवर, शिवसेना भवनावर सत्कार करणारे, वाझे म्हणजे लादेन आहे का? असे सवाल करणारे, कोविडच्या काळात भ्रष्टाचाराचे नवनवे विक्रम करणारे, महाराष्ट्राला मृत्यूदरात नंबर वन बनवणारे मुख्यमंत्री अचानक भावनिक कसे झाले?
‘महाराष्ट्राला असा सुसंस्कृत आणि विचारी मुख्यमंत्री मिळाला नाही’ हे संजय राऊतांनी म्हणणे ठिक आहे, असे बोलल्याशिवाय चार वेळा राज्यसभेची उमेदवारी मिळत नाही, पण मीडियाचे काय? गेली अडीच वर्षे अभावानेच बाहेर पडणाऱ्या, नाईलाजाने पद सोडणाऱ्या अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांचा त्यांना कळवळा का येतो?

हे ही वाचा:

सेटलवाड अटकेविरोधातील आंदोलनात कॅथलिक समाजाला ओढले जात आहे!

मिलिंद घाग महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष

एकनाथ शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, फडणवीस उपमुख्यमंत्री!

ही हिंदु्त्वाची लढाई आहे, आम्हाला पदे नको होती!

उद्या लोकशाहीचा नवा पाळणा हलणार आहे, असा टोमणा जाता जाता मुख्यमंत्र्यांनी मारला. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना दफन करून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळ्यात गळा घालून सरकार स्थापन केले होते, तेव्हाही त्यांनी लोकशाहीचा पाळणा हलवला होता की? मग आता त्यांना का त्रास होतोय. तेव्हा मतदारांशी गद्दारी केली, त्याची सव्याज फळं त्यांना मिळतायत, एवढा साधा आणि सरळ हिशोब आहे.

आम्ही झुकलो नाही, वाकलो नाही, असा दावा करणाऱ्या शिवसेनेला भाजपा नेते राव दानवे यांनी पत्रकारांसमोर बोलताना या दाव्याचा निकाल लावला, वाकल्याशिवाय मुख्यमंत्री झाले काय? असा सवाल त्यांनी केला. ज्यांना भरभरून दिलं ते विसरले ज्यांना काहीच दिलं नाही ते सोबत उभे आहेत. याच साध्या लोकांच्या ताकदीच्या बळावर आव्हान परतवली, या शब्दात सामान्य शिवसैनिकाचे उद्धव ठाकरे यांनी तोंडभरून कौतूक केले आहे. गेल्या अडीच वर्षात अशा किती सामान्य शिवसैनिकाला उद्धव ठाकरे भेटले, त्यांची विचारपूस केली?

उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदी पायउतार होण्याने मराठी माध्यम आणि मर्जीतल्या पत्रकारांचे डोळे पाणावले असतील कदाचित पण सर्वसामान्य माणूस खुष आहे. नारायण राणे, नीतेश राणे, किरीट सोमय्या, शिवराय कुलकर्णी, यांच्यासह अनेक सर्वसामान्य लोकांवर वरवंटा चालवणारे फक्त वसूलीत मग्न असलेले सरकार एकदाचे गेले म्हणून महाराष्ट्रातील जनता खूष आहे. आता तरी मुंबई मेट्रो, मराठवाडा वॉटर ग्रीड सारख्या राजकारणाच्या बळी ठरलेल्या योजना मार्गी लागतील, सर्वसामान्यांचे प्रश्न सुटतील. वाफा आणि पांचट कोट्यांपासून जनतेची सुटका होईल या कल्पनेने लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्र मोकळा श्वास घेतोय. मळभ फिटले आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,921चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
14,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा