एकीकडे अंधेरीत संतापाने लाल झालेले उद्धव ठाकरे भाजपा, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करत असताना बीकेसीत एकनाथ शिंदे यांनी आपल्या पाठीराख्यांना कानमंत्र दिला. ते म्हणाले की, आपल्याला कोणी गॉडफादर नाही, शिवसेनेचा विचार, बाळासाहेबांचे विचार, आनंद दिघे यांचे विचार हेच आपले गॉडफादर आहे. तुम्ही आमदार व्हाल, खासदार व्हाल, मंत्री व्हाल. पण सर्वात आधी तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहात हे कदापी विसरू नका. ज्या शिवसैनिकांनी आपल्याला मोठं केलं. महापौर, नगरसेवक, मंत्री, मुख्यमंत्री झाले. हा शिवसैनिक आपल्याला मोठं करतो. तो लोकात जातो. आपलं मार्केटिंग, ब्रँडिंग करतो. पण जेव्हा संकटात असतो तेव्हा त्याच्या पाठी उभं राहिलं पाहिजे. शिवसैनिकाला अडचणीत मदत करा, तो आयुष्यभर तुमच्यासोबत राहील असं बाळासाहेब म्हणायचे. आपण शिवसेना वाढवण्याचं आणि घडवण्याचं काम केलं. असे एकनाथ शिंदे म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या सभेचे बीकेसीत आयोजन करण्यात आले होते.
“बाळासाहेबांची शिवसेना आपल्याकडे आली. धनुष्यबाण आपल्याकडे आलं. शिवसेना वाचवण्याचं काम तुम्ही केलं. म्हणाले जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि न्याय मिळवून घेऊ. पण जनतेने त्यांचा नक्शा उतरवून टाकला. शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे आहे”, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.
“आतापर्यंतच्या इतिहासात असा विजय कधी मिळाला नव्हता. त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे. आपल्याला चौपट वेगाने काम करावं लागेल. त्यासाठी अहोरात्र काम करायला मी तयार आहे. हा भगवा डौलाने फडकवत ठेवेल हा शब्द देतो. बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा करणार नाही हे सांगतो, असेही शिंदे यांनी सांगितले.
हे ही वाचा:
बांगलादेशी-रोहींग्यांचा मुद्दा कुणाच्या धोतरात शिरणार?
१५ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी, ५ महिला आणि ५ मुलांसह १७ बांगलादेशींना अटक!
उत्तराखंडने समान नागरी संहिता अधिसूचित केली
दिशा सालीयन प्रकरणी आदित्य ठाकरे अडचणीत, न्यायालयाने सुनावले
माझ्यासोबत तुम्ही रात्रीचा दिवस करून काम केलं. पायाला भिंगरी लावून आपण काम केलं हा मी माझा विजय समजतो. जबरदस्त छप्परफाड विजय आहे. आतापर्यंतच्या इतिहासात असा विजय कधी मिळाला नव्हता. त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे.
जिनके इरादे बुलंद होते है, वही चट्टानों को गिराते है और जो तुफानों में पलते है, वही दुनिया बदलते है… असे म्हणत एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही उठाव केला. कारण कोणत्याही म्हणून कोणत्याही खुर्चीपेक्षा आपल्याला स्वाभिमान महत्त्वाचा आहे. बाळासाहेबांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला आहे. अडीच वर्षात मी किती वर्षाचे काम केले त्याचे मोजमाप तुम्ही करा असे आवाहन यावेळी एकनाथ शिंदे यांनी केले.