लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि एनडीएला महाराष्ट्रात रोखण्यात यशस्वी ठरल्यानंतर विधानसभेत मात्र सुपडा साफ झालेल्या उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे हे २३ जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सभेत भाजपा आणि गृहमंत्री अमित शहांवर घसरले. संतापलेल्या उद्धव ठाकरेंनी आगामी पालिका निवडणुकांत सूड उगविण्याची भाषा केली.
ते म्हणाले की, यावेळेला सूड उगवून पाहिजे, सूड, सूड होय सूड. मराठी आईच्या कुशीवर जो वार करतो, त्यांचा वरदहस्त मला महाराष्ट्रात दिसता कामा नये. भ्रमातून बाहेर या आपली तयारी झालीय अशी खात्री झाली की मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेणार. जर शपथ घेत असाल तर मी एकट्याने लढण्याचा निर्णय घेईन.
अंधेरीत झालेल्या या सभेत उद्धव ठाकरेंनी मुस्लिमांची ग्वाही देत आपण कसे हिंदुत्ववादी आहोत हे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, “विधानसभेत आपण गाफिल राहिलो. पण त्याचा गैरफायदा त्यांनी घेतला. मात्र आपण हिंदुत्व सोडलं नाही. तुम्ही मला सांगा मी हिंदुत्व सोडलं असेल तर. मी चेंबूरच्या चिता कॅम्पमध्ये भाषण केलं. तिथे मोठ्या संख्येने मुस्लिम होते. मी हिंदीत भाषण केलं. त्यांना म्हटलं मी हिंदुत्व सोडलं का? माझं हिंदुत्व मान्य आहे का? तर ते हो म्हणाले.
“शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं नसतं आणि औरंगजेबाला मोकळं सोडलं असतं तर गुजरात बिजरात पहिलं औरंगजेबाच्या चरणी लीन झालं असतं. संपूर्ण देशच हिरवा झाला असता. त्यामुळे जय श्रीराम आणि जय शिवराय म्हटलंच पाहिजे”, असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपाने आपल्या झेंड्यातील हिरवा रंग काढावा असे आव्हान दिले.
हे ही वाचा:
शिवसेनेचा, बाळासाहेबांचा, आनंद दिघेंचा विचार हाच आमचा गॉडफादर!
आरोपीला हस्तक्षेप याचिका करण्याचा अधिकार नाही…
‘राष्ट्रग्रंथ : आधारस्तंभ लोकशाहीचा’ प्रयोगाचा शुभारंभ २६ जानेवारीला
पुण्यात बांगलादेशीकडे सापडले १५ आधार कार्ड, ८ पॅन कार्ड, ८ जन्मदाखले!
ते भाजपा आरएसएसवर घसरले. ते म्हणाले की, आम्ही ९७ची निवडणूक लढवल्यानंतर महाजन वगैरे आले. तेव्हा मातोश्रीचे उंबरठे झिजवायचे. हे भाजप आणि संघवाले असेच आहेत. काड्या लावायच्या, पेटवायचे आणि बाजूला व्हायचे. बाबरीवरून वातावरण तापवले आणि बाबरी पडल्यावर आम्ही नाही केलं असं म्हणून नामानिराळे राहिले. हे तुमचं हिंदुत्व?
एक वर्षापूर्वी आयोध्येच्या मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. अजून त्या मंदिराचं कामच पूर्ण झालं नाही. तेव्हा शिवसैनिक नसते तर तुम्ही दिसलाच नसता. आम्ही हिंदूच आहोत. मात्र जय श्रीरामच्या नावावर उन्माद चालला आहे. आम्ही जय श्रीराम बोलतो. तसं तुम्हाला महाराष्ट्रात जय शिवराय बोलावचं लागेल. जसं जय हिंद नंतर जय महाराष्ट्र बोलतो. तसंच जय श्रीरामनंतर जय शिवराय बोललंच पाहिजे, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला बहुमत मिळाले. त्यानंतर ईव्हीएम मशिनवरच आरोप केले गेले. महाविकास आघाडीला केवळ ४६ जागांवर समाधान मानावे लागेल. या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीकडून सातत्याने ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, अशी मागणी केली जात आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी भाजपला खुले आव्हान देताना म्हटले की, लाज असेल तर ईव्हीएम बाजूला करा आणि एक तरी निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा.