ड्रग्स माफिया ललित पाटीलला अटक केल्यानंतर ड्रग्स प्रकरणाशी संबंधित अनेकांची नावे समोर आली.ड्रग्स प्रकरणी चौकशी दरम्यान सलमान फाळके याचे नाव पुढे आले.याच सलमान सोबत ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्यासोबत, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत काढलेले फोटो समोर आले आहेत.शिंदे गटाच्या महिला नेत्या मनीषा कायंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ड्रग्स प्रकरणी संबंधित असलेल्या साथीदारसोबत जितेंद्र आव्हाड आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे फोटो सादर केले.
मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मनीषा कायंदे म्हणाल्या, नाशिकमध्ये ड्रग्स प्रकरणात ललित पाटील या व्यक्तीला अटक करण्यात आली. त्यावेळेस ललित पाटील हे २०२० मध्ये उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते असल्याचे समोर आले, कदाचित ते अजूनही असतील. त्यांच्या हातामध्ये शिवबंधन बांधलेले असल्याचे फोटो सुद्धा आपण पहिले आहेत. या चौकशीदरम्यान आणखी सात-आठ नावे समोर आली. ज्यात प्रामुख्याने सलमान फाळके हे मोठे नाव होते, ज्याच्याकडे ५४ ग्राम एमडी ड्रग सापडले होते.
हे ही वाचा:
इस्रायलने संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या राजीनामा मागितला
१३ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना ‘पी एम किसान’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेचा लाभ मिळणार
निलेश राणेंच्या राजकीय निवृत्तीवर मंत्री रवींद्र चव्हाणांनी घेतली भेट!
ठाकरे हमास, लष्कर ए तैय्यबाशीही युती करतील!
या सलमान फाळके सोबत ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्यासोबत, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत काढलेले फोटो मिळाले आहेत. शिवसेनेच्या मंत्र्यांवर उठसुठ बेछूट, तथ्यहीन आरोप करणाऱ्या जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे ड्रग प्रकरणातील एका आरोपीसोबत फोटो कसे काढले, त्या आरोपीसोबत आपली काय जवळीक आहे, त्याचे जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी मनीषा कायंदे यांनी यावेळी केली.
मनीषा कायंदे पुढे म्हणाल्या की, हे फोटोज बरेच काही सांगून जातात. आम्हाला फक्त त्यामागचे सत्य जाणून घ्यायचे आहे. आरोपींना शोधून काढण्याचे काम पोलिसांचे आहे. गृहमंत्र्यांनी पोलिसांना याबाबत सक्त आदेश दिलेले आहेत. हे आरोपी कुणाच्या जवळचे आहेत, याना कुणाचे राजकीय अभय आहे का, याचा सुद्धा शोध घ्यावा लागेल. महाराष्ट्रामध्ये ड्रग्स सारख्या गोष्टी फोफावत असतील तर त्याला वेळीच आळा घातला पाहिजे. यामध्ये कुणाचे राजकीय अभय असेल, तर त्याची सुद्धा सखोल चौकशी करून त्यावर कारवाई व्हायला हवी अशी आमची मागणी असल्याचे मनीषा कायंदे सांगितले.