मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून आपला विकासनामा जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत या विकासनाम्याचे प्रकाशन झाले. मुंबईचा सर्वांगीण, सुरक्षित आणि शाश्वत विकास साधण्यावर या विकासनाम्यात विशेष भर देण्यात आला आहे. या विकासनाम्यात मुंबईला बांग्लादेशी व रोहिंग्यामुक्त करण्याची ठाम घोषणा करण्यात आली आहे. यासंदर्भात भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी यापूर्वीच पुढाकार घेतला असून, शहरातील विविध भागांत जाऊन अभियान राबवत बनावट आधार कार्ड व अन्य कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी तब्बल १७ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. शहरातील बाजारपेठा व भाजी मंडईंचे नूतनीकरण व पुनर्विकास करण्यात येईल. बीएमसीच्या बाजारांमध्ये मासळी विक्रेत्यांसाठी कोल्ड स्टोरेज सुविधा उभारली जाणार असून, फिश इम्पोर्ट–एक्सपोर्ट सेंटर स्थापन करण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. लघुउद्योग धोरण राबवून स्थानिक रोजगारनिर्मितीला चालना देण्यात येणार आहे.
हे ही वाचा :
सर्वप्रथम एमआयएम पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बुरखाधारी महिलेला तर बसवा!
उबाठाचे निष्ठावान दगडू सकपाळ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
जेएनयूतले डाव्यांचे विद्यार्थी आंदोलन की वैचारिक विघटन..?
तिने खोमेनींच्या जळत्या फोटोने सिगारेट पेटवली आणि ठिणगी पडली!
मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून, पागडीमुक्त मुंबई तसेच फनेल झोनसंदर्भातील जाहीर केलेल्या योजना वेगाने राबवण्यात येणार आहेत. सार्वजनिक वाहतुकीसाठी बेस्ट उपक्रमांतर्गत २०२९ पर्यंत पूर्णतः इलेक्ट्रिक बसेस आणल्या जाणार असून, महिलांना ५० टक्के सवलत देण्यात येईल. बेस्ट बसची संख्या सध्याच्या ५ हजारांवरून १० हजारांपर्यंत वाढवण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे.
तरुणाई व उद्योजकतेसाठी स्टार्टअप इनक्युबेशन सेंटर उभारले जाणार आहे. लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर करण्यासाठी आणि लघुउद्योग सुरू करण्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे. मराठी भाषेसाठी पालिकेत स्वतंत्र विभाग स्थापन केला जाणार असून, मराठी कला केंद्र व अभ्यासिका उभारण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रम राबवले जाणार आहेत.
पर्यटनाला चालना देण्यासाठी स्वतंत्र पर्यटन विभाग स्थापन केला जाणार असून, हुतात्मा स्मारक चौकात जागतिक दर्जाचे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. तसेच नाट्यगृहांच्या पुनर्विकासाचेही आश्वासन देण्यात आले आहे. विकसित मुंबईसाठी २०३४ पर्यंतचा आराखडा तयार करून शहराच्या भविष्यासाठी दीर्घकालीन नियोजन करण्याचा निर्धार महायुतीने व्यक्त केला आहे.
महायुतीच्या वचननाम्यतील महत्त्वाची आश्वासने
– मुंबईला पाणीपुरवठा वाढवण्यासाठी पुढील ५ वर्षात गारगाई, पिंजाळ, दमणगंगा प्रकल्प पूर्ण करणार
– पर्यावरण संवर्धन योजनेमार्फत १७ हजार कोटी रुपये
– बीएमसी मार्केटमध्ये मासळी विक्रेत्यांसाठी कोल्ड स्टोरेज उभारणार
– सर्व भाजी मंडईचे नुतनीकरण आणि पुर्नविकास करणार
– फिश इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट सेंटर स्थापन करण्यात येणार
– लघु उद्योग धोरण राबवले जाणार
– पुर्नविकासाला जलदगती देणार, पागडीमुक्त मुंबई आणि फनेल झोनप्रश्नी जाहीर केलेली योजना जलदगतीने राबविणार
– बेस्टमध्ये २०२९ पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसेस
– बेस्टमध्ये महिलांना ५० टक्के सवलत
– बेस्ट बसेसची संख्या ५ हजारवरुन १० हजारांवर जाणार
– स्टार्टअप इनक्युबेशन सेंटरची उभारणी करणार
– लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर करण्यासाठी व लघु उद्योग स्थापन करण्यासाठी ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
– रोहिंग्या व बांगलादेशी मुक्त मुंबई करणार
– पालिकेत स्वतंत्र मराठी भाषा विभागाची स्थापना करणार
– मराठी कला केंद्र आणि अभ्यासिकेची उभारणी करणार
– बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्ताने मराठी तरुणांसाठी विशेष कार्यक्रम आणि आर्थिक तरतूद राबवली जाणार
– पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभागाची स्थापना करणार
– हुतात्मा स्मारक चौकात जागतिक दर्जाचं संग्रहालय उभारणार
– रविंद्र नाट्य मंदिराच्या धर्तीवर अन्य नाट्यगृहांचा पुर्नविकास करणार आणि गरज पडल्यास ३ नवीन नाट्यगृहे उभारणार
– विकसित मुंबईसाठी २०३४ चा आराखडा तयार होणार







