पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रयागराजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभ मेळ्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. यावरून आता नव्या वादाला तोंड फुटले असून भाजपाने ममता यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला केला आहे. महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीची घटना आणि गैरव्यवस्थापनावरून ममता यांनी योगी सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी या धार्मिक सभेला “मृत्यू कुंभ” असे संबोधले.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “हा ‘मृत्युकुंभ’ आहे. मी महाकुंभाचा आदर करते. पवित्र गंगा मातेचा आदर करते. पण यासाठी कोणतीही योजना नाही, किती मृतदेह बाहेर काढले आहेत? श्रीमंत आणि व्हीआयपी लोकांना १ लाख रुपयांपर्यंतच्या कॅम्प्सची सुविधा देण्याची तरतूद आहे. कुंभमेळ्यात गरिबांसाठी कोणतीही व्यवस्था नाही. जत्रेत चेंगराचेंगरीची परिस्थिती सामान्य आहे, त्यासाठी व्यवस्था करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही कोणत नियोजन केले आहे,” अशी टीका त्यांनी केली आहे.
ममता यांनी केलेल्या टीकेवर भाजपाने त्यांना तातडीने प्रत्युत्तर दिले आहे. तसेच त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. ममता यांचे वक्तव्य म्हणजे हिंदूंवरील हल्ला असल्याचे म्हटले आहे. भाजपा नेते अमित मालवीय यांनी आरोप केला की, ममता यांच्या वक्तव्यांमुळे त्यांचा ढोंगीपणा उघड झाला आहे. एका समुदायाचे तुष्टीकरण आणि दुसऱ्या समुदायाबद्दल थेट शत्रुत्व, अशी त्यांची भूमिका असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला संबोधित करताना, ममता बॅनर्जी यांनी पुढे भाजपावर टीका करताना म्हटले की, ते राष्ट्राचे विभाजन करण्यासाठी धर्म विकत आहेत. तसेच महाकुंभ धार्मिक सभेसाठी योग्य नियोजनाचा अभाव असल्याचाही त्यांनी आरोप केला. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मृतदेह कुंभमेळ्यातून बंगालला शवविच्छेदन न करता पाठवण्यात आले तुम्ही मृत्यू प्रमाणपत्रांशिवाय मृतदेह पाठवले म्हणून आम्ही येथे शवविच्छेदन केले. या लोकांना भरपाई कशी मिळेल? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता यांच्यावर टीका करत यावर लोकांना तीव्र निषेध नोंदवण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, मी हिंदू समुदायाला, संत समुदायाला तीव्र निषेध नोंदवण्याचे आवाहन करतो. हिंदूंवरील, महाकुंभावरील या हल्ल्याविरुद्ध आवाज उठवा. जर तुम्ही खरे हिंदू असाल तर राजकारणाच्या पलीकडे जाऊन ममता बॅनर्जींच्या या शब्दांना तीव्र विरोध करा,” अशी टीका त्यांनी केली आहे.
हे ही वाचा :
सिसोदियांनी शासकीय वस्तू चोरल्या
अखिलेश यादव यांचा दुटप्पीपणा उघड; महाकुंभसाठी चुलत बंधूना व्हीआयपी सुविधा
युट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या मनात घाण, न्यायालयाने कान उपटले!
कुत्र्यावर खुर्ची उगारणे तरुणाला महाग पडले, एका व्यक्तीने केलेल्या हल्लात अंगठा गमवावा लागला!
भाजपा आयटी सेलचे प्रमुख आणि पश्चिम बंगालचे प्रभारी अमित मालवीय यांनीही ममता यांच्यावर टीका करत म्हटले की, ममता बॅनर्जी कधीही त्यांच्या मतपेढीला खूश करण्याची संधी सोडत नाहीत. जेव्हा हिंदू सण आणि परंपरांचा विचार केला जातो तेव्हा त्यांचा दृष्टिकोन तिरस्कार आणि शत्रुत्वाकडे वळतो.