देशात मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये निवडणुकींचा रणसंग्राम रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष मैदानात उतरले असून जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान, भारत राष्ट्र समितीच्या खासदारांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे.
तेलंगणामधील खासदार कोथा प्रभाकर रेड्डी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार करताना रेड्डी यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आला. यात रेड्डी हे गंभीर जखमी झाले आहेत. रेड्डींना सिकंदराबाद येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
खासदार कोथा प्रभाकर रेड्डी यांना भाजपाचे विद्यमान आमदार रघुनंदन यांच्याविरोधात दुब्बका मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. या प्रचारासाठी ते मैदानात उतरले होते. अशातच सोमवार, ३० ऑक्टोबर रोजी सिद्धीपेठ येथे प्रचार करताना एक अनोळखी व्यक्ती रेड्डी यांच्याजवळ आली. तेव्हा रेड्डींना ही व्यक्ती हस्तांदोलन करत आहे, असं वाटलं. पण, अचानक या व्यक्तीने चाकू बाहेर काढला आणि त्यांच्या पोटात खुपसला. या हल्ल्यात रेड्डी गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर भारत राष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांनी अनोळखी व्यक्तीला पकडून चोप दिला. त्यानंतर हल्लेखोराला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे.
हे ही वाचा:
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे ‘वैभव’ ईडीच्या निशाण्यावर
ललित पाटील प्रकरणात ससूनमधील कैदी रुग्ण समितीच्या अध्यक्षांचा राजीनामा
आंध्र प्रदेशात दोन रेल्वेगाड्या धडकल्या, १४ ठार
केरळमधील बॉम्बस्फोटमालिकेचा २० सदस्य करणार तपास
दरम्यान, खासदार रेड्डी यांना सिकंदराबादमधील यशोदा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हल्ल्याची माहिती मिळताच भारत राष्ट्र समितीच्या नेत्यांनी रेड्डी यांच्याशी फोनवरून संपर्क साधत प्रकृतीची माहिती घेतली. मंत्री टी. हरीश राव यांनीही रेड्डी यांच्याशी चर्चा केली असून राव यांनी सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.