लालू यादव यांचे मोठे पुत्र आणि आता जनशक्ती जनता दलाचे प्रमुख तेज प्रताप यादव यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधत टीका केली आहे. राहुल गांधी यांनी राजकारणी बनण्यापेक्षा स्वयंपाकी (आचारी) बनायला हवे, असा खोचक सल्ला त्यांनी दिला आहे. शनिवारी राहुल गांधी बिहार निवडणुकीच्या प्रचारासाठी बेगुसरायला गेले होते. यावेळी एका जाहीर सभेला संबोधित केल्यानंतर त्यांनी मच्छिमारांची भेट घेतली आणि ते एका तलावात उतरले. तेथे त्यांनी स्थानिक मच्छिमारांसोबत पारंपारिक पद्धतीने मासेमारी केली. यावरून तेज प्रताप यादव यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र डागले आहे.
जनशक्ती जनता दलाचे प्रमुख तेज प्रताप यादव यांनी राहुल गांधींबद्दल म्हटले की, “राहुल गांधी यांचे काम मोटारसायकल चालवणे आणि प्रदूषण करणे आहे. ते त्यांचे संपूर्ण आयुष्य मासेमारी करण्यात घालवतील. देश अंधारात बुडेल. जलेबी तळणे, मासे पकडणे, अशी कामे ते करत राहतील. ते स्वयंपाकी असायला हवे होते, राजकारणात का आले?” अशी खोचक टीका तेज प्रताप यादव यांनी केली आहे.
यापूर्वी, भाजप खासदार रवी किशन यांनीही या मुद्द्यावरून राहुल गांधींची खिल्ली उडवली होती. त्यांनी म्हटले होते की त्यांच्याकडून जितके मासे पकडले जातील त्यापेक्षा कमी मते त्यांना मिळतील. “राहुल गांधी यांनी जेवढे मासे पकडले होते, त्यापेक्षाही कमी मते त्यांना मिळतील. ठीक आहे, किमान त्यांची पोहण्याची शैली चांगली होती. आम्ही तिथे मतं पकडत आहोत, आणि ते मासे पकडण्यात व्यस्त आहेत,” अशी खोचक टीका त्यांनी केली होती.
हे ही वाचा..
बनावट पासपोर्ट, आधार कार्ड, बीएआरसी आयडी वापरून कमावले कोट्यवधी रुपये
बडबड भोवली, असीम सरोदेंची सनद तीन महिन्यांसाठी रद्द
“पाकिस्तान, चीन अण्वस्त्रांची चाचणी करत आहेत!” ट्रम्प यांचा गौप्यस्फोट
नक्षलवाद संपला, बिहारच्या चोरमाराचे गावकरी करणार मतदान!
बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होतील. तेज प्रताप यादव हे महुआ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, जिथून त्यांनी १६ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.







