मुंबईतून एका ६० वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली होती. भाभा अणु संशोधन केंद्रात (BARC) शास्त्रज्ञ असल्याची बतावणी या व्यक्तीने केली होती. या प्रकरणी कारवाई दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. संवेदनशील अणु डेटाची देवाणघेवाण करण्यासाठी या व्यक्तीला कोट्यवधी रुपयांचा परदेशी निधी मिळाला होता, अशी माहिती समोर आली आहे.
गेल्या माहिन्यात मुंबई पोलिसांनी अख्तर हुसैनी याला बीएआरसी शास्त्रज्ञ असल्याची खोटी ओळख दाखवून देशभर प्रवास केल्याबद्दल अटक केली होती. यानंतर झारखंडच्या जमशेदपूर येथील रहिवासी असलेल्या हुसैनीकडून अण्वस्त्रांशी संबंधित १० हून अधिक नकाशे आणि डेटा देखील जप्त करण्यात आला आहे. यासोबतच त्याच्याकडून अनेक बनावट पासपोर्ट, आधार आणि पॅन कार्ड, बनावट बीएआरसी आयडी देखील जप्त करण्यात आली आहे. एका आयडीवर त्याचे नाव अली रझा हुसेन होते, तर दुसऱ्या आयडीवर त्याचे नाव अलेक्झांडर पामर असे असल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, अख्तर हुसैनीचा भाऊ आदिल यालाही दिल्लीतून अटक करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, हुसैनी बंधूंना १९९५ पासून परकीय निधी मिळू लागला. सुरुवातीला त्यांना लाखो रुपये देण्यात आले, पण साल २००० नंतर त्यांना कोटी रुपये देण्यात आले. बीएआरसी आणि इतर अणुऊर्जा प्रकल्पांशी संबंधित गुप्त ब्लू प्रिंटच्या बदल्यात हे पैसे देण्यात आल्याचा संशय आहे. तपासादरम्यान, पोलिसांना अख्तर हुसैनीच्या नावाने एक खाजगी बँक खाते देखील आढळले, ज्यामध्ये संशयास्पद व्यवहार आढळले होते. पोलिसांनी आता बँकेकडून संपूर्ण व्यवहाराची माहिती मागवली आहे जेणेकरून निधीची नेमकी रक्कम आणि स्रोत निश्चित करता येईल.
दोन्ही भावांनी त्यांनी यापूर्वी वापरलेली अनेक इतर बँक खाती बंद केली आहेत. त्यामुळे संपूर्ण पैशाचा माग काढण्यासाठी पोलिस जुन्या खात्यांच्या नोंदी तपासत आहेत. दोन्ही भावांनी पाकिस्तानला भेट दिली होती आणि त्यांचे इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (ISI) शी संबंध असू शकतात असाही संशय आहे.
हेही वाचा..
बडबड भोवली, असीम सरोदेंची सनद तीन महिन्यांसाठी रद्द
“पाकिस्तान, चीन अण्वस्त्रांची चाचणी करत आहेत!” ट्रम्प यांचा गौप्यस्फोट
नक्षलवाद संपला, बिहारच्या चोरमाराचे गावकरी करणार मतदान!
विश्वविजेत्या महिला संघाला बीसीसीआयकडून ५१ कोटी
अख्तर याने १९९६ मध्ये झारखंडमधील वडिलोपार्जित घर विकले परंतु त्याच्या जुन्या संपर्कांच्या मदतीने तो बनावट कागदपत्रे मिळवत राहिला, अशी माहिती आहे. त्यानंतर आदिलने त्याची ओळख झारखंडमधील मुनाझील खानशी करून दिली, ज्याने हुसैनी मोहम्मद आदिल आणि नसीमुद्दीन सय्यद आदिल हुसैनी यांच्या नावाने त्यांच्यासाठी दोन बनावट पासपोर्ट बनवले. पासपोर्टवर उल्लेख केलेला पत्ता जमशेदपूरमधील त्यांच्या घराचा होता जे घर जवळजवळ ३० वर्षांपूर्वी विकले गेले होते. पोलिसांना संशय आहे की दोन्ही भावांनी परदेशात प्रवास करण्यासाठी या बनावट कागदपत्रांचा आणि बनावट ओळखपत्रांचा वापर केला.







