दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून फेब्रुवारी महिन्यात निवडणुका होणार आहेत. दिल्लीत आप, भाजपा आणि काँग्रेस अशा तीन प्रमुख पक्षांमध्ये तिरंगी लढत होणार आहे. ‘इंडी’ आघाडीमधील घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि आप दिल्लीच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकरे आहेत. हे दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आप आणि काँग्रेसमध्ये दिल्लीच्या निवडणूक रिंगणात जबरदस्त कलगीतुरा रंगला आहे. एकीकडे प्रचार सभांमधून टीकास्त्र डागली जात असतानाचं आता सोशल मीडियावरही हा वाद चांगलाच रंगला आहे.
आपकडून शनिवारी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आहे. त्यांच्या या पोस्टमध्ये आपकडून भाजपासह काँग्रेसला निशाण्यावर घेण्यात आले आहे. यात अरविंद केजरीवाल यांचा फोटो असून “केजरीवाल यांचा प्रामाणिकपणा सर्व बेईमान लोकांवर भारी पडेल” अशी ओळ देण्यात आली आहे. तर, त्याखाली भाजपामधील प्रमुख नेत्यांचे आणि काँग्रेस नेत्यांचे फोटो देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचाही फोटो आहे.
हे ही वाचा :
रिलायन्स भारतात उभारणार जगातील डेटा सेंटर्सच्या तुलनेत तिप्पट क्षमता असलेले सेंटर!
सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मुंबईत जनआक्रोश मोर्चा
अमेरिकेतून बेकायदेशीर स्थलांतरितांच्या हद्दपार मोहिमेला सुरुवात
२६/११ चा दहशतवादी तहव्वुर राणाला भारतात आणणार
निवडणुकीच्या प्रचारकाळात काँग्रेस आणि आप दोघांकडूनही भाजपापेक्षा जास्त एकमेकांना लक्ष्य केले जात असल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे. दिल्लीत घेतलेल्या पहिल्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी भाजपापेक्षा ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर जोरदार निशाणा साधला होता. खोटी आश्वासने देण्याच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांना सुनावले होते. यानंतर अरविंद केजरीवाल यांनीही एक्सवर राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देत टीकेची झोड उठवली होती. त्यांनी म्हटले होते की, “राहुल गांधी दिल्लीत आले आणि त्यांनी मला खूप शिव्या दिल्या. पण, मी यावर काहीही बोलणार नसून त्यांची लढाई काँग्रेसला वाचवण्यासाठी आहे आणि माझी लढाई देशाला वाचवण्यासाठी.” दुसरीकडे तृणमूल काँग्रेस, ठाकरे गट आणि समाजवादी पक्ष यांसारख्या प्रमुख इंडी आघाडीमधील पक्षांनी आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ला पाठिंबा दिला असून दिल्ली निवडणुकीत काँग्रेस एकाकी पडल्याचे चित्र आहे.