29 C
Mumbai
Friday, February 26, 2021
घर राजकारण ‘गजा मारणे’ मार्गावर संजय राठोड

‘गजा मारणे’ मार्गावर संजय राठोड

Related

कुख्यात गुंड गजा मारणे याची अलिकडेच खूनाच्या आरोपातून निर्दोष सुटका झाल्यानंतर त्याने तळोजा तुरुंगातून स्वत:ची भव्य मिरवणूक काढून घेतली. गुंडाना सामाजिक प्रतिष्ठा नसते, त्यामुळे ते भपका आणि ताकद दाखवून प्रतिष्ठा पदरी पाडून घेण्याच्या प्रयत्नात असतात. पूजा चव्हाण या बंजारा समाजातील तरुणीच्या आत्महत्येनंतर बरेच दिवस गायब असलेल्या वनमंत्री संजय राठोड यांना लोकांसमोर येण्यासाठी गजा मारणेचा मार्गच अनुसरावासा वाटला.

पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर व्हायरल झालेल्या ऑडियो क्लीपमधून संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर ते गायब झाले. एक जबाबदार नागरीक आणि राज्य सरकारमधील सन्माननीय मंत्री म्हणून त्यांनी लोकांसमोर येऊन आपली बाजू मांडायला हवी होती. परंतु त्यांनी हा मार्ग टाळला. लोकांसमोर येण्यासाठी त्यांनी ‘गजा मारणे मार्ग’ पत्करला. समर्थक आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीत त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. शेकडो गाड्यांच्या ताफ्यात शेकडो समर्थकांसोबत ते पोहरादेवीच्या दर्शनाला गेले.

त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. ठाकरे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यात हा नवा प्रकार सुरू आहे. महिलेवर अत्याचार करणारे पोलिसांच्या हाती येत नाहीत; थेट पत्रकार परिषदेतच उगवतात. विनयभंगाचा आरोप असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेहबूब शेखने हेच केले होते.

पत्रकार परिषदेत संजय राठोड आपल्या निष्पापपणाचे पुरावे सादर करतील अशी शक्यता कमी होती. आपल्या पत्नीला ब्लड प्रेशर आहे, आई-वडिलांना कसा त्रास होतोय अशी कैफीयत राठोड यांनी मांडली. माझी, माझ्या कुटुंबियांची आणि समाजाची बदनामी करू नका, असे भावनिक आवाहन केले.

महाराष्ट्रातले राज्यकर्ते किती निर्ढावलेले आहेत हे यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आले. सतत फुले, शाहु आणि आंबेडकर यांच्या नावाची जपमाळ ओढणारे राज्यकर्ते महाराष्ट्रात सत्तेवर आहेत. अशा राज्यात २२ वर्षाची एक तरुणी आत्महत्या करून आयुष्य संपवते.

तिच्या आत्महत्या प्रकरणात एका वजनदार राजकीय नेत्याचा हात असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर सत्ता अस्थिर होण्याच्या भीतीने राज्यकर्ते अस्वस्थ होतात. तो नेता बदनाम होऊन आयुष्यातून उठेल या विचाराने मुख्यमंत्री चिंतित होतात. फोटो, ऑडीयो क्लीप्स असे पुरावे असताना पोलिसांना त्या नेत्याला अटक करावीशी वाटत नाही. आत्महत्येनंतर बरेच दिवस गायब असलेला हा नेता गाड्यांच्या ताफ्यासोबत आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करतो. जीवानिशी गेलेल्या त्या तरुणीच्या वेदनांची साधी चर्चाही होत नाही.

फुले, शाहु आणि आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे घडते. याचा अर्थ स्पष्ट आहे. यापुढे ज्याच्या पाठी समाजाची ताकद आहे अशा आरोपीची चौकशी होणार नाही. पोलिस त्याला हात लावणार नाहीत. त्याचा फैसला कायद्याच्या चौकटीत होणार नाही. राजकीय ताकद, संपत्ती, गाड्यांचे ताफे, कार्यकर्त्यांचे पाठबळ याच्या जोरावर गुन्ह्याचा फैसला होणार.

तळोजा तुरुंगातून निर्दोष सुटका झाल्यानंतर गुंड गजा मारणेने मिरवणूक काढली म्हणून त्याला पुन्हा एका दिवसासाठी का होईना अटक करण्यात आली. ताकद दाखवून समाजात भय निर्माण करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.

परंतु राज्यात प्रत्येकाला वेगळा कायदा आणि वेगळे निकष आहेत असे चित्र आहे. गजा मारणेच्या पाठीशी कदाचित राजकीय ताकद नसावी, किंवा कमी पडली असावी.

संजय राठोड हे मंत्री असल्यामुळे त्यांची साधी चौकशी झालेली नाही. आपण मागास समाजातून येतो, ओबेसींचे नेतृत्व करतो म्हणून आपल्याविरोधात घाणेरडे राजकारण सुरू असल्याचा आरोप राठोड यांनी केला. राठोड म्हणतायत त्यात तथ्य असू शकते. सरळमार्गी राजकारण इतिहास जमा झालेले आहे. परंतु राठोड हे निर्दोष आहेत किंवा नाही हे चौकशी शिवाय कसे स्पष्ट होऊ शकते?

परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांच्यावर जेव्हा ‘मी टू’ प्रकरणी आरोप झाले तेव्हा अकबर यांच्याविरोधात कोणताही सबळ पुरावा नसताना त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी शिवसेनेने केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फार विचार न करता अकबर यांना नारळ दिला होता.

एका महिलेच्या प्रतिष्ठेसाठी मित्र पक्षाच्या मंत्र्याचा राजीनामा मागण्याची शिवसेनेची उज्वल परंपरा आहे. परंतु स्वत:च्या पक्षाच्या मंत्र्यावर आरोप झाल्यानंतर शिवसेनेला या परंपरेचा विसर पडलेला दिसतो. परंतु राठोड यांनी तरी पक्षाच्या प्रतिष्ठेचा विचार करून मंत्रीपदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे गेले पाहीजे होते.

व्हायरल झालेल्या ऑडीयो क्लीप्समध्ये असलेला आवाज त्यांचा नसल्याचे त्यांनी पुरावे दिले पाहीजे होते. ज्या अरुण राठोडशी फोनवर हा संपूर्ण संवाद झालेला आहे, त्याच्याशी कोणताही संबध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले पाहीजे होते. त्यांच्याच समाजातील तरुणी असलेल्या पूजा चव्हाणशी कोणत्याही प्रकारचे संबध नव्हते असे जाहीर केले पाहीजे होते. परंतु त्यांनी पत्रकार परीषदेत यातले काहीच न सांगता मी मागास समाजातून आलो आहे, मी ओबीसी नेता आहे, माझ्या पत्नीचे ब्लड प्रेशर वाढले आहे ही अनावश्यक माहीती दिली.

अमक्या समाजाचा असल्यानंतर महिलांवर अत्याचाराचा परवाना मिळतो अशी कोणतीही तरतूद घटनेत नाही. देशाचा कायदा सर्वांसाठी सारखा आहे. राठोड ज्या समाजाचे असल्याचे वारंवार सांगतायत पूजा चव्हाण ही देखील त्याच समाजातील दुर्देवी तरुणी आहे.

राज्यात शक्ती प्रदर्शनाचा हा तमाशा राज्य सरकार निमूटपणे बघत आहे. रेणू शर्माच्या प्रकरणात धनंजय मुंडे अडचणीत आले तेव्हा शरद पवारांनी रेणू शर्माच्या विरोधात अनेक जणांनी तक्रारी केल्याचे सांगून तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह लावण्याचा प्रयत्न केला. सत्ताधाऱ्यांच्या दुर्दैवाने पूजा चव्हाण हिने आयुष्य संपवल्यामुळे तिच्याबाबतीत चारित्र्य हननाचा पर्याय शिल्लक नाही. तो वापरला तर लोक तोंडात शेण घालतील. राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनानंतर राज्य सरकार काय भूमिका घेते याकडे आता सर्वाचे लक्ष आहे. परतुं संजय राठोड हे विदर्भातील शिवसेनेचे दमदार नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांनी बचावासाठी जातीची ढाल समोर केली आहे, त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई तर दूरची गोष्ट साधी चौकशी होईल काय हा सवाल आहे. ठाकरे सरकारच्या राज्यात दिशा सालियनच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांना शिक्षा झाली नाही. पूजा चव्हाणप्रकरणीही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. पूजानंतर हा सिलसिला थांबणार आहे काय हा कळीचा प्रश्न आहे?

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,259चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
659सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा