30 C
Mumbai
Sunday, December 5, 2021
घरराजकारण‘दलाल’ व्हायरसचा बळी

‘दलाल’ व्हायरसचा बळी

Related

भाजपाचा तरुण तडफदार नगरसेवक सुनील यादव याचा १ सप्टेंबरच्या पहाटे मृत्यू झाला. वयाच्या अवघ्या पन्नाशीत त्याला मृत्यूने गाठले. त्याच्या अंत्यदर्शनाला उसळलेली गर्दी आणि सोशल मीडियावर त्याला श्रद्धांजली देणाऱ्या पोस्टचा पडलेला पाऊस लक्षात घेता या युवा नेत्याच्या आकस्मिक जाण्याने लोकांच्या मनात निर्माण झालेली हळहळ लक्षात येऊ शकेल.

सतत माणसांमध्ये रमणारा, पक्षासाठी झपाटल्यासारखे काम करणारा हा तरुण अचानक इतका निराश का झाला होता? कोरोनाच्या साथीत अनेक लोक बरे होत असताना, सुनील का सावरू शकला नाही? पक्षाने याबाबत थोडा विचार करण्याची गरज आहे. पक्ष वाढेल म्हणून इतर पक्षांतून कुमक घेत असताना, त्यांच्यामुळे पक्षासाठी लढणाऱ्या निष्ठावानांचा शक्तीपात होत असेल तर पक्ष मजबूत होईल की कमकुवत?

सुनीलचा मृत्यू कोरोनानंतर खालावलेल्या प्रकृतीमुळे झाला हे अर्धसत्य आहे. अलिकडे भाजपासह सर्वच पक्षात दिसणारा ‘दलाल’ नावाचा व्हायरसही त्याला कारणीभूत होता. हा व्हायरस नेहमी दुसऱ्या पक्षातून आलेला असतो. हे असे लोक असतात ज्यांच्याकडे क्षमता असेल नसेल, पण उपद्रव क्षमता प्रचंड असते. वाकण्याच्या बाबतीत हे एखाद्या स्प्रिंग पेक्षाही लवचिक असतात. नेत्यांशी जवळीक निर्माण करण्याची हातोटी त्यांच्याकडे असते. हे लोक नेत्यांच्या पाया पडतात. त्यांचे जोडे उचलतात, वेळ आली तर त्यांनी थुंकलेले चाटून ते किती गोड आहे याचे उत्तम वर्णन करू शकतात.

बरबटलेल्या चेहऱ्याने पक्षात काम करणे कठीण आहे हे लक्षात आल्यावर ते इमेज मेकींगसाठी पावले टाकायला सुरूवात करतात. सगळ्यात आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उत्सवात सहभागी होतात. असे काही महिने गेले की संघाचा पूर्ण गणवेश घालून ते उत्सवात प्रकटतात.

एकदा का पक्षात स्थिरस्थावर झाले की ते हातपाय पसरू लागतात. पक्षातील निष्ठावंताची जागा व्यापू लागतात. सुनीलचे करीयरही अशाच एका व्हायरसने ग्रासलेले. हा व्हायरस पक्षा-पक्षाच्या वाऱ्या करून भाजपात सामील झालेला. कधी काळी बनावट कार्ट्रेज बनवण्याचे धंदे करणारा, त्यासाठी अटक झालेला. पुढे त्याने अंधेरी एमआयडीसीच्या एसआरएमध्ये हातपाय पसरले. बोगस कागदपत्रे बनवून मोठ्या संख्येने फ्लॅट हडपल्यामुळे हाताशी पैशाची कमी नव्हती. हा पैसा त्याने खिरापतीसारखा वाटला. राजकारणात आजकाल पैशाने वाट्टेल ते विकत घेता येते. पद आणि गॉडफादर सुद्धा.

सुनीलचा गेली काही वर्षे याच व्हायरसशी संघर्ष सुरू होता. आपण संघाचे स्वयंसेवक, पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते पक्षासाठी आपण केसेस घेतल्या, तुरुंगात गेलो. प्रकृतीची माती करून घेतली आणि काल पक्षात आलेल्या नेत्याला आपल्याच डोक्यावर बसवण्याचे कारस्थान सुरू आहे, यामुळे तो प्रचंड अस्वस्थ होता. कधी काळी आपल्याशी जवळीक असलेले कार्यकर्ते-पदाधिकारी हळुहळु त्याच्या सोबत जाऊन उभे होत आहेत हे पाहून त्याला त्रास होत होता. अनेकदा तो ही घुसमट बोलूनही दाखवायचा. तो ज्या वॉर्डचा नगरसेवक होता, तिथपर्यंत त्या व्हायरसच्या कारवाया पोहोचल्या. पक्षात तक्रारी करून दाद मिळत नव्हती. यातूनच तो खचत होता. आपल्याला आपल्याच लोकांशी लढावे लागते आहे, ही खंत त्याला पोखरत होती.

हे ही वाचा:

अनिल देशमुखांच्या वकिलालाच अटक

अनिल देशमुख यांनी दरोडा घालायचा आणि पोलिसांनी काय हार घालायचा का?

माजी खासदार चंदन मित्रा कालवश

भारत ओव्हलवर ५० वर्षांचा इतिहास मोडीत काढणार?

बाहेरून आलेल्या अनेक नेत्यांनी भाजपाचा पसारा वाढवण्यात हातभार लावला हे सत्य आहे. त्यात आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वसर्मा यांच्यासारखी काही मोठी आणि आदरणीय नावेही आहेत. ही मंडळी महत्वाकांक्षी असली तरी ती पक्षाची विचारधारा पाहून पक्षाकडे आकर्षित झाली. महाराष्ट्रातही अशी काही उदाहरणे सांगता येतील. परंतु हे सन्मानीय अपवाद आहेत हे लक्षात घेण्याची गरज आहे. अपवादाने नियम सिद्ध होत नाही. रामायणात एखादा बिभीषण असतो, महाभारतात असा एखादा युयुत्सू असतो.

भाजपात येणारे लोंढे पक्षाला आलेली सत्तेची झळाळी पाहून येत आहेत. त्यातल्या अनेकांकडे ना ध्येयधोरणे ना विचार. येन केन मार्गेण त्यांना सत्तेच्या सोपानापर्यंत पोहोचायचे असते. कालपर्यंत अशा लोकांना काँग्रेसचा राजमार्ग वाटायचा, आज भाजपा वाटतो आहे. सत्तेच्या उबेसाठीच ते जगत असतात. सत्ता दूरावल्याचे दिसतातच त्यांचा मुकूल रॉय होतो.

अशा व्हायरसची चलती होऊ नये ही संघविचार मानणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. एक सुनील घडवायला, काही वर्षे लागतात. असे सुनील गमावणे पक्षाला आणि संघटनेला परवडणारे नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,510अनुयायीअनुकरण करा
4,880सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा