29 C
Mumbai
Sunday, July 25, 2021
घरराजकारणकोण होतीस तू? काय झालीस तू??

कोण होतीस तू? काय झालीस तू??

Related

साधारणपणे दीड वर्षापूर्वी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत महाविकास आघाडीचा प्रयोग करत महाराष्ट्रातली सत्तेची खुर्ची मिळविली आणि शिवसेनेचा एक वेगळाच चेहरा महाराष्ट्राला पाहायला मिळाला. मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचे प्रत्येकाचेच स्वप्न असते, पण शिवसेनेने हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पद मिळविण्यासाठी आपल्या कट्टर विरोधकांशी जवळीक साधली, तेव्हा महाराष्ट्रातील राजकीय विश्लेषण करणाऱ्यांना तोंडात बोटे घालण्यावाचून पर्याय राहिला नाही. ज्या पक्षांवर निवडणुकीच्या प्रचारात घणाघाती प्रहार केला, ज्यांची कठोर निंदा केली, त्याच जोरावर ५६ जागा निवडून आणल्या त्यांच्याशीच सोयरीक केली.

भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न असे गोंडस नाव त्याला देण्यात आले. केवळ भाजपाला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी शिवसेनेने हे केले? अजिबात नाही. त्यांना भाजपासोबत युतीत सत्ता उपभोगताना हे राज्यातील सर्वोच्च पद हवे होते, पण देवेंद्र फडणवीस असताना त्यांना हे शक्य झाले नसते. म्हणूनच त्यांनी आपल्या कट्टर विरोधकांशी संधान बांधून आपले इप्सित साध्य केले. पण त्यातून काय साध्य झाले? शिवसेनेचा पसारा वाढला की या दोन पक्षांच्या सोबतीने वाटचाल करताना वाढ खुंटली?  आम्ही एकत्र आहोतच्या कितीही गमजा मारल्या तरी या तिन्ही पक्षात सारे काही आलबेल नाही, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झालेले आहे. एक काळ होता की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांमधून काँग्रेस किंवा शरद पवारांच्या राजकारणाची पुरती पिसे काढली जात असत. सोनिया गांधींवर शिवसेनाप्रमुखांनी केलेल्या टीकेचे अनेक व्हीडिओ आजही शिवसेनेला त्याची याद करून देतात. शिवसैनिकांसाठी तेच अमृत होते. त्याच काँग्रेसशी शिवसेनेने आज हातमिळवणी केली आहे. शिवसेनेने आज त्याच पक्षांचे बंधन केवळ भाजपाच्या विरोधापायी आपल्या हातात बांधून घेतले. ते बंधन आता बेड्या ठरू लागले आहे.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत लोकांनी भाजपा-शिवसेना यांची युती पाहूनच मतदान केले होते. त्यामुळे हे दोन पक्ष एकत्र राहिले असते तर सत्तेत येण्यापासून त्यांना कुणीही रोखू शकले नसते. मात्र केवळ मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपायी शिवसेनेने आपली पत पणाला लावली.

मध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘तारांबळ’ हा शब्द आपल्या फेसबुक लाइव्हमध्ये वापरला होता. तीच अवस्था आज शिवसेनेची झाली आहे. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी शिवसेनेने स्वतःची गत करून घेतली आहे. संजय राऊत जे बोलतात, जे लिहितात तीच शिवसेनेची भूमिका बनली आहे. सांगा, शिवसेनेचा कोणता नेता आज प्रसारमाध्यमांसमोर येऊन शिवसेनेची बाजू तळमळीने मांडतो. एकही नाही. त्याचे कारण ही उडालेली तारांबळ. हिंदुत्वाबद्दल बोलायचे तर सोबतचे पक्ष दुखावणार आणि हिंदुत्वाबद्दल बोलायचे नाही तर समर्थकांना काय तोंड दाखवणार? त्यामुळेच मग राममंदिराच्या जमीन खरेदीविक्रीत नसलेल्या घोटाळ्याबद्दल टाहो फोडावा लागतो. राममंदिर जणू आम्हीच बांधले असा आव आणावा लागतो. तथाकथित पुरोगामी असल्याचा मुखवटा पांघरून हिंडावे लागते.

गेल्या या दीड वर्षांच्या त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात अशी अनेक उदाहरणे देता येतील, ज्यात शिवसेनेची ही तारांबळ अवघ्या महाराष्ट्राने पाहिली आहे. ही विरोधक असलेल्या भाजपाची चाल नाही तर शिवसेनेने स्वतः अंगावर ओढवून घेतलेली आफत आहे. होय, हे शिवसेनेने स्वतःवर ओढवून घेतलेले संकट आहे. कारण बाकी दोन पक्ष केवळ मजा पाहण्यात मग्न आहेत. मग अर्णब गोस्वामीचे प्रकरण असो की कंगनाच्या घरावर मारलेला हातोडा. प्रत्येकवेळी ठाकरे सरकारच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. स्वाभाविकच त्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावरच आली आहे. बाकी दोन पक्ष मजा बघत राहिले. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाने सरकारची उरलीसुरलीही प्रतिष्ठा धुळीस मिळाली. तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख, त्याआधी वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. त्याच प्रकरणात शिवसेनेचे लाडके पोलिस अधिकारी सचिन वाझे तुरुंगात गेले आणि पुढे बडतर्फ झाले. आता शिवसेनेतूनच निवडणूक लढलेले प्रदीप शर्मा अटकेत आहेत. परमबीर सिंग यांनी तर या सरकारकडून आपल्याला वसुली करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती, असा भांडाफोड करून या सरकारला आणखी गाळात घातले. ही सगळी भाजपाची चाल होती, असा कांगावा करून कातडी वाचवता येणार नाही. या आणि अशा सगळ्या प्रकरणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांचे नुकसान झाले नाही कारण ते मुळातच शिवसेनेच्या जोरावर सत्तेत आले. आयती आलेली संधी ते कसे सोडतील? शिवसेनेने मात्र सगळे गमावले.

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे खुर्चीवर विराजमान झाले पण प्रशासनातील अननुभवामुळे त्यांची तिथेही तारांबळच उडाली. महाराष्ट्रात वादळे आली, पूर आले, इमारती कोसळल्या, ज्या मुंबईत शिवसेनेची सत्ता आहे ती मुंबई एका दिवसाच्या पावसाने तुंबली, ऑक्सिजन गळतीने काही लोक मृत्युमुखी पडले पण मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे घराबाहेर पडू शकले नाहीत. कारणे काहीही असतील पण सर्वसामान्य लोक विचारणारच. तिकडे शरद पवार मात्र प्रकृती अस्वास्थ्य असतानाही महाराष्ट्रात फिरले, ते शिवसेनेची तारांबळ उडविण्यासाठीच की काय?

भाजपाने पहिल्यांदा शिवसेनेसोबत महाराष्ट्रात सत्तेची चव चाखली तेव्हा ते छोट्या भावाच्या रूपात होते. पण त्यांनी पक्षबांधणी करत २०१४मध्ये १२२ जागा जिंकून आणल्या. मग अशा पक्षाला आमचे बोट धरून हा पक्ष मोठा झाला असे हिणवण्यात शिवसेनेने का धन्यता मानली?  शिवसेनेला त्यांच्यापेक्षाही मोठे होण्याची संपूर्ण संधी होती. पण शिवसेनेने त्या निवडणुकीत ६३ आणि आता ५६ जागा मिळवल्या, त्याला जबाबदार भाजपा आहे काय? राजकारणात कधी एक पाऊल मागे जावे लागते, स्वतःला मुरड घालावी लागते, दुसऱ्याच्या कलानेही घ्यावे लागते, ते केले नाही की मग अशी तारांबळ उडते.

शिवसेनेच्या ५५व्या वर्धापनदिनानिमित्त शिवसेनेने घोडदौड सुरू असल्याचे सांगण्यापेक्षा या तारांबळीचे कठोर आत्मपरीक्षण करावे. आंदोलन करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना चोप दिल्याचा वृथा अभिमान बाळगून गेलेली ही पत पुन्हा मिळविता येणार नाही. कारण आता ते दिवस राहिलेले नाहीत. जनमत बदलले आहे, लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे. आता भाजपाविरोधात निवडणुकीच्या मैदानात दोन हात करावे लागतील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,287अनुयायीअनुकरण करा
2,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा