31 C
Mumbai
Sunday, June 4, 2023
घरराजकारणइथून झाली जयंत पाटील - अजित पवार यांच्या शीतयुद्धाला सुरूवात

इथून झाली जयंत पाटील – अजित पवार यांच्या शीतयुद्धाला सुरूवात

पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अजित पवार प्रचंड दुखावले गेले. हेच कारण आहे, ज्यामुळे अजित पवारांनी जयंत पाटील यांना फोन केला नाही.

Google News Follow

Related

ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सगल ९ तास चौकशी केली. तरीही अजित पवार यांनी त्यांना फोन करून त्यांची चौकशी करण्याची तसदी घेतली नाही. अजितदादा आणि पाटील यांच्या संबंधात सर्व काही आलबेल नाही हे स्पष्ट करणारी ही घटना. या शीतयुद्धाला सुरूवात होण्याचे कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारच आहेत. पवारांनी काही दिवसांपूर्वी दिलेला राजीनामा याच्या मुळाशी आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा दिला होता. महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ निर्माण केली होती. पवारांची ही खेळी होती. त्या वेळी पक्षात अशा काही घटना घडत होत्या ज्यामुळे त्यांना पवारांना धक्कातंत्राचा वापर करणे अनिवार्य झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि पवारांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे प्रफुल्ल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पवारांच्या भेटीला गेले. फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रफुल पटेल यांनी दाऊद गँगशी संबंधित इक्बाल मिर्चीच्या परीवाराशी केलेल्या सौद्या प्रकरणी वरळीतील सीजे हाऊसमधील चार मजल्यांवर जप्ती आणली होती. पटेल यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांमध्ये अजित पवारांसह केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर असलेल्या नेत्यांचा भरणा होता. या तमाम नेत्यांना पवारांच्या समोर आपली भूमिका मांडली. ‘राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपासोबत गेले पाहिजे, असे पक्षातील बहुसंख्य आमदारांना वाटते. शिउबाठासोबत फार काळ राहण्यात काय हशील नाही. काँग्रेसचा कोणताही भरवसा देता येत नाही. असे या शिष्टमंडळाने पवारांना सांगितले.’

हे ही वाचा:

दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन व्हेंटिलेटरवर

मायावतींचा संसदभवन उद्घाटनाला पाठिंबा; विरोधकांना सुनावले

मोफत तिकीट द्या, वीज द्या…कर्नाटकवासी काँग्रेस सरकारच्या लागले मागे

राज्याच्या बारावीच्या निकालात कोकण सरस, मुंबईने गाठला तळ, मुलींनी मारली बाजी

शिवसेना फुटण्यापूर्वी आमदार प्रताप सरनाईक यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अशाच आशयाचे पत्र दिले होते. भाजपासोबत गेले पाहिजे, असा आग्रह धरला होता. तसाच आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी धरला होता. पवारांनी त्याला साफ नकार दिला. ‘भाजपासोबत जाता येणार नाही’, असे स्पष्ट बजावले. काही नेत्यांनी याप्रकरणी आग्रही भूमिका घेतल्यानंतर वातावरणाचा एकूण रंग पवारांच्या लक्षात आला.

‘तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचाय तो घ्या, मी भाजपा सोबत जाणार नाही’, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘तुम्ही सगळे गेलात तर मी एकटा पक्ष चालवेन’, असा निर्वाणीचा इशारा पवारांनी दिला. ज्या गटाने पवारांच्या समोर प्रस्ताव ठेवला, त्याचे नेतृत्व प्रफुल पटेल यांनी करावे याला एक वेगळे महत्व आहे. पटेल हे पवारांचे हमराज आहेत. अनेक दशकं पवारांचे सोबती आहेत. केंद्रात यूपीएचे सरकार असताना पटेलांना नागरी हवाई उड्डाण मंत्रालयासारखे अत्यंत महत्वाचे खाते मिळाले ते पवारांशी असलेल्या घनिष्ठ संबंधांमुळे. पटेल या आमदारांचे नेतृत्व करत होते, त्यामुळे वातावरणाचे गांभीर्य पवारांच्याही लक्षात आले.

‘तुम्ही एकदा जयंत पाटलांशी याबाबत चर्चा करा’, असे पवारांनी त्यांना सांगितले. पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांना पवारांनी पुढे केले. जेव्हा हे आमदार जयंत पाटील यांच्याकडे पोहोचले तेव्हा पक्षातील घमासान कमी होण्याऐवजी वाढली.

चर्चेदरम्यान पाटील अत्यंत आक्रमक होते. त्यांनी अजित पवार आणि पटेल या दोन्ही नेत्यांना भाजपासोबत जाण्याच्या प्रस्तावावरून तिखट शब्दात सुनावले. पाटील इतके आक्रमक होते की अजितदादांना सपशेल माघार घ्यावी लागली. जिथे दादा माघार घेतात तिथे पटेल टीकतील कसे? परंतु ही माघार तात्पुरती आहे, हे पवारांनी ओळखले. हे बंड थंड करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आग आतल्या आत धुमसत राहणार. पुन्हा कधी तरी याचा स्फोट होणार हे पवारांच्या लक्षात आले. त्यांनी त्यांचा गेमप्लान ठरवावा. आधी ‘भाकरी परतण्याची वेळ झाली आहे’, असे सांगून पहिला इशारा दिला. काही प्रमाणात वातावरण निर्मिती करून घेतली. त्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशन सोहळ्यात राजीनाम्याचा बॉम्ब टाकला.

राष्ट्रवादीकडे सध्या ५४ आमदार आहेत. गेल्या काही दिवसात पक्ष फुटणार अशा वावड्या वारंवार उठताना दिसतायत. पक्ष फुटीसाठी किमान ३६ आमदारांची गरज आहे. प्रचंड दबाव असून सुद्धा त्यावेळी पक्ष फुटला नाही त्याचे महत्वाचे कारण म्हणजे ज्या गटाची भाजपासोबत जाण्याची इच्छा होती, त्यांच्या कडे ३३ आमदारांचे बळ होते. तीन आमदार कमी पडत होते. त्यामुळे ही फूट टळली. शरद पवारांनी राजीनाम्याची घोषणा करून खुंटा बळकट करून घेतला. परंतु या सर्व राजकीय नाट्यात जयंत पाटील यांनी घेतलेली ताठर भूमिका त्यांना भोवली. अर्थात जयंत पाटील यांनी घेतलेली आक्रमक भूमिका पवारांनीच चाव्या दिल्यामुळे घेतली असावी, असे मानायला वाव आहे. पाटील हे पवारांचे निष्ठावंत मानले जातात. त्यामुळे बंडखोरांना फटकारण्यासाठी पवारांनी त्यांचा वापर करून घेतला असेल तर आश्चर्य नाही.   पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अजित पवार प्रचंड दुखावले गेले. हेच कारण आहे, ज्यामुळे अजित पवारांनी जयंत पाटील यांना फोन केला नाही. सलग नऊ तास चौकशी सुरू होती. अनेक नेत्यांनी जयंत पाटील यांना फोन करून त्यांना दिलासा दिला.

शिउबाठाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही जयंत पाटील यांना फोन केला नाही. अजित पवार हे मात्र अपवाद ठरले. जेव्हा जयंत पाटील यांना अजित पवारांनी तुम्हाला फोन केला का, असे जेव्हा विचारले तेव्हा उत्तर देताना जंयत पाटील यांच्या चेहऱ्यावर कडवट आणि ताठर भाव होते. ईडीची चौकशी झालेल्या एकाही नेत्याला आपण फोन केला नव्हता, असा खुलासा अजित पवारांनी केलेला आहे. परंतु इतरांना जो निकष अजित दादा लावतात तोच निकष त्यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना लावला. परंतु थोडी गफलत होते आहे, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी थोडी माघार घेतली. मी त्यांची वैयक्तिक भेट घेणार आहे, असे दादांनी जाहीर केले. राष्ट्रवादीतील घडामोडींचे कथानक आता रंजक वळणावर आलेले आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,850चाहतेआवड दर्शवा
2,021अनुयायीअनुकरण करा
76,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा