भारताचे दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी गेल्या वर्षभरात अनुक्रमे टी२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या ते फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) टॉड ग्रीनबर्ग यांनी संकेत दिले की, या दोन्ही दिग्गजांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यांच्या अखेरच्या सामन्यांमध्ये भव्य आणि संस्मरणीय निरोप दिला जाईल.
भारताचा संघ १९ ते २५ ऑक्टोबरदरम्यान पर्थ, अॅडलेड आणि सिडनी येथे तीन वनडे सामने खेळणार आहे. त्यानंतर २९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान पाच टी२० सामने होतील.
महिला संघ देखील WPL-2026 नंतर मल्टी-फॉरमॅट मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.
IANS शी व्हर्चुअल संवादात बोलताना ग्रीनबर्ग म्हणाले, “भारताचा पुरुष आणि महिला संघ, त्याशिवाय आशेस मालिकेमुळेही यंदाचा उन्हाळा खऱ्या अर्थानं क्रिकेटप्रेमींना पर्वणी ठरणार आहे. जवळपास दोन दशकांनंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया प्रत्येक राजधानीत आणि क्षेत्रीय ठिकाणी आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करणार आहे.”
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी त्यांच्या प्री-सेल विंडोची घोषणा केली आणि एका दिवसात सर्वाधिक तिकीट विक्रीचा विक्रमही नोंदवला. यामुळे ऑस्ट्रेलियन आणि भारतीय चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
ग्रीनबर्ग पुढे म्हणाले, “बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत गेल्या वर्षी विक्रमी तिकीट विक्री झाली होती. यंदाच्या हंगामातही तीव्र प्रतिसाद मिळेल, अशी आम्हाला आशा आहे. यंदाचा क्रिकेट हंगाम ऑगस्टपासून मार्चपर्यंत सुरू राहील आणि हा ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा हंगाम ठरू शकतो.”
पूर्वी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनचे प्रमुख राहिलेल्या ग्रीनबर्ग यांनी पुढे सांगितले, “कदाचित हीच शेवटची वेळ असू शकेल, जेव्हा आम्ही विराट कोहली आणि रोहित शर्माला ऑस्ट्रेलियात खेळताना पाहणार आहोत. त्यामुळे त्यांना अशा प्रकारे निरोप द्यायचा आहे, जो त्यांच्या जागतिक क्रिकेटमधील महान योगदानाचं प्रतीक ठरेल.”
