सनरायझर्स हैदराबादकडून रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा ४२ धावांनी झालेला पराभव आता पंजाब किंग्ससाठी मोठी संधी घेऊन आला आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने दावा केला आहे की, “पंजाब किंग्स यंदाच्या आयपीएलमध्ये टेबल टॉपर होऊ शकते.”
या पराभवानंतर आरसीबी गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी गेली असून गुजरात टायटन्स पहिल्या तर पंजाब किंग्स दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पंजाब किंग्सला अजून दोन सामने खेळायचे आहेत. जर त्यांनी दोन्ही सामने जिंकले, तर ते २१ गुणांसह सरळ पहिल्या क्रमांकावर पोहोचतील.
जिओ हॉटस्टारवरील चर्चेदरम्यान उथप्पाने स्पष्ट सांगितले की, “श्रेयस अय्यरने टीमचं नेतृत्व जबरदस्त केलं आहे. प्रभसिमरन सिंह, नेहल वढेरा आणि प्रियांश आर्य हे भारतीय खेळाडू दमदार फॉर्ममध्ये आहेत. अशावेळी स्थानिक खेळाडूंचं प्रदर्शन कोणत्याही संघासाठी निर्णायक ठरतं.”
माजी वेगवान गोलंदाज वरुण आरोननेही उथप्पाच्या मताला दुजोरा दिला. त्याने सांगितले की, “गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स हे माझ्या मते टॉप-२ संघ आहेत.”
आरसीबीकडून विराट कोहली आणि फिल साल्ट यांनी सुरुवात चांगली दिली होती. मात्र दोघे बाद झाल्यानंतर उर्वरित फलंदाज अपयशी ठरले. २३२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीचा डाव १९.५ षटकांत १८९ धावांवर आटोपला.
