श्री चिंतामणी षट्पदी’ हे आदिशंकाराचार्यांनी भगवान गणेशाच्या चिंतामणी रूपाची स्तुती करण्यासाठी समर्पित असणारे अत्यंत पूजनीय, पवित्र स्तोत्र वा भक्तिगीत रचले आहे. चिंतामणी अर्थात असे एक मौक्तिक किंवा अद्भुत रत्न ज्याच्याशी इच्छा पूर्ण करण्याची/होण्याची कल्पना येऊन थांबते. मात्र गणेशाला ‘चिंतामणी’ संबोधताना या शब्दाला अधिक सूक्ष्म अर्थ प्राप्त होतो. त्यानुसार, जो भक्त गणेशाचे चिंतन करतो, त्याच्या सर्व चिंतांचे हरण करणारा ‘गणराय’ हा त्याच्यासाठी चिंतामणीच ठरतो, अशी सुंदर कल्पना या चिंतामणी षट्पदीमध्ये मांडली आहे. म्हणजेच हे स्तोत्र केवळ गणेशरूपाचे वर्णन नसून भक्त आणि उपास्य यांच्यातील नाते उलगडणारी रचना ठरते.



