भारत-बांग्लादेश सीमेवर सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) सोन्याची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीस अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल २.८२ कोटी रुपयांच्या किंमतीचे २० सोन्याचे बिस्किट जप्त करण्यात आले आहेत. ही माहिती बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. बीएसएफने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पश्चिम बंगालमधील भारत-बांग्लादेश आंतरराष्ट्रीय सीमेजवळील होरंदीपूर बीओपीवर तैनात दक्षिण बंगाल फ्रंटियरच्या ३२ व्या बटालियनच्या जवानांनी एका भारतीय तस्कराला पकडले.
गुप्त आणि विश्वासार्ह माहितीनुसार जवानांनी एकूण २३३२.६६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्किट जप्त केले. शनिवारी रात्री होरंदीपूर सीमा चौकीवरील जवानांना गुप्तचर स्रोतांकडून माहिती मिळाली की, मुस्लिमपारा गावातील एक व्यक्ती बांग्लादेशातून आणलेल्या सोन्याची तस्करी करण्याच्या तयारीत आहे. माहिती मिळताच अधिकाऱ्यांना अतिरिक्त दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आणि संशयिताला रंगेहाथ पकडण्यासाठी ठिकाणी सापळा रचण्यात आला.
हेही वाचा..
ममता बॅनर्जींचे अजब वक्तव्य; रात्रीच्या वेळी मुलींनी बाहेर पडू नये!
गाझा शांतता बैठकीसाठी इजिप्तचे अध्यक्ष सिसी यांचे मोदींना आमंत्रण!
पंजाबमध्ये कोणत्या औषधांवर घातली बंदी ?
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रविवारी सकाळी सुमारे ६ वाजता गस्त पथकाने एका व्यक्तीस बांबूच्या झुडुपामागे फिरताना पाहिले. त्यानंतर त्याला वेढा घालून पकडण्यात आले. तपासणीदरम्यान त्याच्याकडे असलेल्या प्लास्टिकच्या पिशवीतून २० सोन्याचे बिस्किट सापडले. आरोपीला घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले आणि पुढील चौकशीसाठी होरंदीपूर सीमा चौकीवर नेण्यात आले. जप्त केलेले सोने आणि आरोपी यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी संबंधित अधिकार्यांकडे सोपविण्यात आले आहे.
बीएसएफ दक्षिण बंगाल फ्रंटियरच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सीमावर्ती भागातील नागरिकांना आवाहन केले आहे की, सोन्याच्या तस्करीबाबत कोणतीही माहिती असल्यास बीएसएफच्या ‘सीमा साथी’ हेल्पलाइन क्रमांक १४४१९ वर संपर्क साधावा किंवा व्हॉट्सअॅप क्रमांक ९९०३४७२२२७ वर संदेश अथवा व्हॉइस नोट पाठवावी. अधिकाऱ्यांनी हेही स्पष्ट केले की, विश्वासार्ह माहिती देणाऱ्याला योग्य बक्षीस दिले जाईल आणि सूचना देणाऱ्याची ओळख पूर्णतः गोपनीय ठेवली जाईल.



