भारतने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर देशाला आपली बलस्थाने लक्षात आली तशा सुरक्षा व्यवस्थांमध्ये असलेल्या त्रुटीही लक्षात आल्या. या त्रुटी दूर करण्यासाठी इस्त्रोने राबवलेल्या दोन मोहिमा अपयशी ठरल्या. या अपयशामागे काही फंदफितुरी आहे का? चीन किंवा पाकिस्तानने काही दगाफटका केलाय का? अशी चर्चा होती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी या प्रकरणी लक्ष घातले, त्यावरून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात यावे. जे काही घडले ते उघड झाले नाही, सर्वसामान्य जनतेपर्यंत ते येईल याची अजिबात शक्यता नाही. परंतु भारताने चूकांमधून धडा घेत अपयशाची मालिका खंडीत केली हे मात्र निश्चित. ४ सप्टेंबर रोजी EOS-05 हा उपग्रह जिओसिंक्रोनस ऑर्बिट अर्थात भूस्थिर कक्षेत पोहचवण्यात इस्त्रोला यश आले. EOS-05 चा वापर नागरी आणि लष्करी कामांसाठी केला जाणार आहे. हवामान, शेती, पर्यावरणावर लक्ष ठेवण्यासाठी हा उपयुक्त आहेच, शिवाय हिंद महासागर, प्रत्यक्ष नियंत्रण रेषा किंवा नियंत्रण रेषेवर २४ सतत नजर ठेवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. ईस्त्रोची ही यशस्वी कामगिरी एकाच वेळी भारताचे अर्थकारण आणि सुरक्षेला बळ देणार आहे.



