मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि आयोगाच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिविजन (SIR) या उपक्रमाचे निमित्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधणाऱ्या विरोधकांमध्ये जोरदार टोळीयुद्ध सुरू असल्याचे चित्र आहे. एसआयआर मोडीत काढण्यासाठी सगळे एकत्र आलेले आहेत. हे निमित्त करून त्यांना मोदी सरकार उलथवायचे आहे. त्यासाठी रस्त्यावर यायचे आणि अराजक निर्माण करायचे, याबाबत सगळ्यांचे एकमत आहे. परंतु तरीही आपसांत धुमश्चक्री सुरू आहे. अनेकदा हे तंटे चव्हाट्यावर येताना दिसतात. श्रेय कोणी घ्यायचे, नेतृत्व कोणी करायचे आणि चेहरा कोण बनणार, हे मतभेदाचे मुद्दे बनले आहेत. या राड्यात न्यायाधीशांनीही उडी घेतली आहे. सगळीकडेच उभी फूट दिसते आहे. राजकारणातील मोदी विरोधकांमध्ये एकवाक्यता नाही; इंडिया आघाडीतील गटतट तर अनेकदा दिसत असतात. तेच चित्र आता मोदी सरकारला दाबण्यासाठी तयार करण्यात आलेल्या तथाकथित ‘प्रेशर ग्रुप’ आणि काँग्रेस पक्षात दिसू लागले आहे. मोदींच्या विरोधकांमध्ये सुरू असलेला हा तंटा खूप खालपर्यंत झिरपला आहे. मुलाखतकार व पत्रकार राजू परुळेकर हे कॉक्रोच जनता पार्टीच्या विरोधात सोशल मीडियावरून सातत्याने आवाज उठवताना दिसतात. राजू परुळेकर यांच्या विरोधामुळे अभिजित दीपके हे अरविंद केजरीवाल यांचेच पिल्लू आहे, यावर शिक्कामोर्तब होत आहे. कारण अण्णा आंदोलनाच्या काळात अण्णा हजारे यांचा आवाज बनलेले परुळेकर यांना केजरीवाल यांच्या षडयंत्रामुळे बाहेर पडावे लागले होते. त्यानंतर बराच काळ केजरीवाल आणि परुळेकर यांच्यात धुमश्चक्री सुरू होती. राजू परुळेकर हे घनघोर मोदी विरोधक आहेत. मोदींच्या विरोधात ते सतत व्यक्त होत असतात; आता ते मोदींचा विरोध करण्यासाठी आंदोलने करणाऱ्या सीजेपीला सातत्याने लक्ष्य करत आहेत. “सीजेपी इज नॉट जेन झी”, ही परुळेकरांची पोस्ट आहे. त्यामुळे दीपके हा ‘आप’च्याच कॅम्पचा माणूस आहे, हे बऱ्यापैकी उघड होत आहे.



