30.5 C
Mumbai
Sunday, June 21, 2026
घरविशेषओमराजेंना धक्का; पवनराजे निंबाळकर हत्येतील सर्व आरोपी निर्दोष

ओमराजेंना धक्का; पवनराजे निंबाळकर हत्येतील सर्व आरोपी निर्दोष

दोन दशकांनंतर निकाल

Google News Follow

Related

महाराष्ट्रातील बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा तब्बल २० वर्षांनंतर अखेर निकाल लागला असून, विशेष सीबीआय न्यायालयाने माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. सबळ पुराव्यांचा अभाव आणि माफीच्या साक्षीदाराच्या साक्षीवरील अविश्वास यामुळे आरोपींना दोषी ठरवता येत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या निकालामुळे ओमराजे निंबाळकर आणि निंबाळकर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

खटल्याचा पाया ज्या माफीच्या साक्षीदारावर उभा होता, त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तपासातील गंभीर त्रुटी, पुराव्यांतील विसंगती आणि पोलिसांच्या काही मूलभूत चुका यामुळे सरकारी पक्षाचा संपूर्ण खटला कोसळल्याचे न्यायालयाने म्हटले. सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. आर. नावंदर यांनी निकालवाचन करताना म्हटले की, “२० वर्षांनंतर हा निकाल देताना न्यायालय केवळ कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेत आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. एका लोकनेत्याची भरदिवसा गोळीबार करून हत्या झाली. सुरुवातीला कळंबोली पोलीस, त्यानंतर नवी मुंबई गुन्हे शाखा आणि नंतर सीबीआयकडे तपास गेला. या खटल्यात तब्बल १२७ साक्षीदार तपासण्यात आले.” न्यायालयाने स्पष्ट केले की, कोणत्याही आरोपीला केवळ संशयावरून दोषी ठरवता येत नाही. दोषारोप सिद्ध करण्यासाठी ठोस आणि विश्वासार्ह पुरावे आवश्यक असतात.

तपासातील सर्वात गंभीर त्रुटीवर भाष्य करताना न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढले. न्यायालयाने म्हटले की, “या प्रकरणात कुठल्याही आरोपीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला नाही. कॉल डिटेल रेकॉर्ड गोळा करण्यात आले नाहीत. आरोपी परस्पर संपर्कात होते का, याचा कोणताही ठोस पुरावा तपास यंत्रणांकडे नाही.” न्यायालयाने पुढे नमूद केले की, जर मोबाईल डेटा आणि सीडीआर सादर करण्यात आले असते, तर आरोपींमधील कथित कट किंवा संपर्क सिद्ध करण्यास मदत झाली असती.

माफीच्या साक्षीदाराने हत्येच्या दिवशी आपण कुठे होतो याबाबत वेगवेगळ्या वेळेला चार वेगळीच माहिती दिल्याचे न्यायालयाने नमूद केले. कधी तो थेट श्रीनाथजीला गेल्याचे सांगतो, कधी अहमदाबादला गेल्याचे, कधी मित्राकडे राहिल्याचे तर कधी नाथद्वारा मार्गे प्रवास केल्याचे सांगतो. या परस्परविरोधी कथनांमुळे त्याच्या संपूर्ण साक्षीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. न्यायाधीशांनी स्पष्ट शब्दांत नमूद केले की, “प्रत्येक वेळी वेगळी कथा सांगणाऱ्या साक्षीदारावर विश्वास ठेवणे शक्य नाही.”

हे ही वाचा:

बंगालमधील ‘पुष्पा’च्या बायकोलाही अटक

FATFच्या उपाध्यक्षपदी आयएएस अधिकारी विवेक अग्रवाल यांची निवड

नीट परीक्षेसाठी नागपूरच्या विद्यार्थ्याला २,४०० किलोमीटर दूर अबूधाबीमधील परीक्षा केंद्र

नशेत धिंगाणा घालणाऱ्या तरुणीचा पोलिसांवर हल्ला; केस ओढत, नखांनी ओरबाडले

न्यायालयाने तपासातील इतर त्रुटींचाही उल्लेख केला. गुन्ह्यात वापरलेली गाडी पूर्णपणे जळून गेली असताना जप्ती पंचनाम्यात तिचा रंग हिरवा असल्याची नोंद करण्यात आली होती. तसेच गाडी नेमकी कुठे उभी होती याबाबतही साक्षीदार, पंचनामे आणि पोलिस नोंदी यामध्ये परस्परविरोधी माहिती आढळली. या सर्व तफावतींमुळे सरकारी पक्षाच्या कथनावर संशय निर्माण झाल्याचे न्यायालयाने म्हटले.

काय होते प्रकरण?

३ जून २००६ रोजी पवनराजे निंबाळकर मुंबईहून धाराशिवकडे निघाले असताना कळंबोली परिसरात त्यांच्या वाहनाला अडवून अज्ञात मारेकऱ्यांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांचा जागीच मृत्यू झाला होता. या हत्येमागे राजकीय आणि व्यावसायिक वैर असल्याचा आरोप करण्यात आला होता. पवनराजे यांचे चुलत बंधू असलेले पद्मसिंह पाटील यांनी भाडोत्री गुंडांच्या माध्यमातून ही हत्या घडवून आणल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला होता.

न्यायालयाने तपासातील गंभीर त्रुटी आणि अपुऱ्या पुराव्यांमुळे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यात डॉ. पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे, मोहन शुक्ला, शशिकांत कुलकर्णी, कैलास यादव, दिनेश तिवारी, पिंटू सिंग आणि छोटे पांडे यांचा समावेश आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
316,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा