दिवाळीदरम्यान धोकादायक अशा कॅल्शियम कार्बाइड बंदुकांच्या वापरामुळे भोपाळमध्ये खळबळ उडाली आहे. जखमी झालेल्या ६० हून अधिक लोकांना, ज्यामध्ये बहुतेक ८ ते १४ वयोगटातील मुले आहेत, भोपाळमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भोपाळचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी (सीएमएचओ) मनीष शर्मा म्हणाले, “कार्बाइड पाईप गन खूप धोकादायक आहेत. या बंदुकांच्या वापरामुळे जखमी झालेल्या ६० जणांवर अजूनही रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. सर्वजण सुरक्षित आहेत.”
दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी भोपाळमध्ये कार्बाइड गनशी संबंधित जखमांची १५० हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बहुतेक प्रकरणांमध्ये जीवाला धोका नसला तरी, अनेक रुग्णांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली आहे, काहींची दृष्टी गेली आहे तर काहींचे चेहरे भाजले आहेत.
गॅस लाईटर, प्लास्टिक पाईप आणि कॅल्शियम कार्बाइड वापरून बनवलेली ही बंदूक दिवाळी उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात वापरली गेली. जेव्हा पाणी कॅल्शियम कार्बाइडच्या संपर्कात येते तेव्हा ते अॅसिटिलीन वायू सोडते, जो ठिणगीच्या संपर्कात आल्यावर स्फोट होतो. या स्फोटामुळे प्लास्टिकचे तुकडे उडतात आणि गंभीर दुखापत होते. विशेषतः चेहरा आणि डोळ्यांना इजा पोहचते. तसेच जेव्हा स्फोट होतो तेव्हा केवळ प्लास्टिक डोळ्याला लागत नाही तर आगीच्या ज्वाला चेहऱ्यावर येतात आणि डोळ्यांना इजा पोहचवतात. यामुळेच लोक त्यांची दृष्टी गमावत आहेत, असे डॉ. कविता कुमार म्हणाल्या.
हे ही वाचा :
भारतातून बेकायदेशीर स्थलांतरित झालेल्या ट्रकचालकाने अमेरिकेत घेतला तिघांचा बळी
स्पाइसजेटच्या विमानाला तांत्रिक बिघाड
रोहित शर्माने मोडला सौरव गांगुलीचा विक्रम!
अत्याचार प्रकरणात अटक झालेल्या टीडीपी नेत्याची तलावात उडी; मृत्यू
भोपाळ रुग्णालयातील नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अदिती दुबे म्हणाल्या की, या रुग्णांमध्ये ७ ते ३५ वयोगटातील मुले आणि प्रौढ दोघेही आहेत. या दिवाळीत, कार्बाइड बॉम्बमुळे झालेल्या एका विशिष्ट प्रकारच्या दुखापती पाहायला मिळाल्या. बऱ्याच प्रकरणांमध्ये, रसायनांमुळे एक किंवा दोन्ही डोळे भाजले. सुमारे २०-३० टक्के रुग्णांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. किरकोळ भाजलेल्यांवर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले.
जखमी मुलांच्या कुटुंबियांनी प्रशासनाला पूर्वसूचना देऊनही कार्बाइड बंदुकांची विक्री रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. सीएमएचओ शर्मा म्हणाले की प्रशासन उत्पादक आणि विक्रेत्यांवर कारवाई करत आहे. १८ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री मोहन यादव यांनी राज्यभरातील जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांना कार्बाइड गनच्या विक्रीवर अंकुश लावण्याचे निर्देश दिले होते. तथापि, निर्देश असूनही, बाजारात ही उपकरणे खुलेआम विकली जात होती.







