महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एका मोठ्या मेफेड्रोन (एमडी) उत्पादन कारखान्याशी थेट संबंध असलेल्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा दुबईस्थित सूत्रधार मोहम्मद सलीम सुहेल शेख उर्फ सलीम शेख याला मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ७ ने दुबईतून हद्दपार केल्यानंतर अखेर अटक केली आहे. कुख्यात ड्रग्ज तस्कर सलीम डोला याचा जवळचा साथीदार असलेला सलीम शेख दुबईत बसून भारतात मोठे ड्रग्जचे जाळे चालवत होता, असा पोलिसांचा आरोप आहे.
कुर्ला येथून तपासाला सुरुवात
या संपूर्ण प्रकरणाचा तपास १६ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू झाला, जेव्हा गुन्हे शाखेच्या कक्ष ७ च्या पथकाने कुर्ला परिसरात सापळा रचून परवीन बानो गुलाम शेख या महिलेला ६४१ ग्रॅम मेफेड्रोन (किंमत १२.२० लाख रुपये) आणि १२ लाख रुपयांच्या रोख रकमेसह अटक केली.
मीरा रोडवरून मोठी जप्ती
परवीनच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, तिने साजिद मोहम्मद आसिफ शेख उर्फ दाब्झ याच्याकडून ड्रग्ज घेतले होते. साजिद हा दुबईहून सलीम शेख आणि सलीम डोला चालवत असलेल्या नेटवर्कचा एक भाग होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत साजिदला मीरा रोड येथून अटक केली. त्याच्या घरातून तब्बल ३ किलो मेफेड्रोन (किंमत ६ कोटी रुपये) आणि ३.६८ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले.
सांगली कारखाना आणि दुबई सिंडिकेट
तपास जसजसा पुढे सरकला, तसतसे दुबईस्थित तस्कर आणि सांगली जिल्ह्यात कार्यरत असलेल्या मेफेड्रोन उत्पादन युनिटमधील संबंध उघड झाले. २५ मार्च २०२४ रोजी, गुन्हे शाखेच्या पथकाने सांगलीतील कारखान्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी २४५ कोटी रुपये किमतीचे १२२.५ किलो मेफेड्रोन, कच्चा माल, उत्पादन यंत्रसामग्री आणि वाहने जप्त केली. या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली होती.
हे ही वाचा :
‘मोदीज मिशन’ : वडनगर ते पंतप्रधान कार्यालय पुस्तक लाँच होणार!
भारतातून बेकायदेशीर स्थलांतरित झालेल्या ट्रकचालकाने अमेरिकेत घेतला तिघांचा बळी
अत्याचार प्रकरणात अटक झालेल्या टीडीपी नेत्याची तलावात आत्महत्या
अमेरिकेचे ‘हे’ पाऊल म्हणजे युद्धाचे कृत्य! रशियाने असे का म्हटले?
आता या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेल्या सलीम शेख याला दुबईहून हद्दपार केल्यानंतर अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१) विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-पूर्व) चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष-७, गुन्हे शाखा, घाटकोपर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत, स.पो.नि. धनाजी साठे, पो.उ.नि. स्वप्निल काळे, पो.उ.नि. महेश शेलार, पो.उ.नि. सावंत, पो.हवा. कांबळे, राऊत, विकास होनमाने, राठोड यांच्या पथकाने ही महत्त्वपूर्ण कारवाई यशस्वीरित्या पार पाडली.







