पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र करत असताना, काश्मीरमधील शोपियानमध्ये लष्कर, पोलिस आणि सीआरपीएफने संयुक्त कारवाईत लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन एके-५६ रायफल, चार मॅगझिन, दोन हँडग्रेनेड आणि दारूगोळा देखील जप्त करण्यात आला.
यासह ५,४०० रुपये रोख आणि एक आधार कार्ड देखील जप्त करण्यात आले आहे. शोपियानच्या बास्कुचन इमामसाहेब येथील ही कारवाई लष्कराच्या ४४ आरआर, पोलिस आणि १७८ सीआरपीएफने केली. एका निवेदनात, पोलिसांनी म्हटले आहे की, लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी इरफान बशीर आणि उजैर सलाम यांनी आत्मसमर्पण केले, ज्यामुळे संभाव्य चकमक टाळता आली.
निवेदनात म्हटले, बास्कुचन येथे घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी दहशतवाद्यांच्या हालचाली दिसून आल्याने परिसराला वेढा घालण्यात आला. सैन्याच्या जलद आणि धोरणात्मक कारवाईमुळे दोन लष्कर-ए-तोयबा दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले.
हे ही वाचा :
बालंबाल बचावलेल्या सिंगापूरची महिला म्हणाली, ऑपरेशन सिंदूर आमच्या हृदयाच्या जवळचे
राखेच्या ढिगाऱ्यात ट्रम्प काय शोधतायत ?
२२ एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दल अलर्ट असून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी जोरदार शोध मोहीम राबविली जात आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, शोपियानच्या केलर भागात आणि पुलवामाच्या त्रालच्या नादर भागात झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये सहा दहशतवादी मारले गेले होते. दोन्ही कारवाईत प्रत्येकी तीन दहशतवादी मारले गेले.
यामध्ये लष्कर-ए-तैयबाचा (एलईटी) एक प्रमुख कमांडर शाहिद कुट्टे याचाही समावेश होता. कुट्टे हा शोपियानमधील हिरपोरा येथील सरपंचावर झालेल्या हल्ल्यात आणि ८ एप्रिल २०२४ रोजी डॅनिश रिसॉर्टमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेत सहभागी होता, ज्यामध्ये दोन जर्मन पर्यटक जखमी झाले होते.
