बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात एक धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे. दरमहा मिळणारी वृद्धापकाळ पेन्शन काढण्यासाठी गेलेल्या ८२ वर्षीय कामेश्वर मिश्रा यांच्या बँक खात्यात तब्बल ७५९ कोटी रुपये शिल्लक असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, त्यांच्या दिव्यांग मुलाच्या खात्यातही कोट्यवधी रुपयांची रक्कम दिसल्याने कुटुंबासह बँक कर्मचारीही अवाक् झाले आहेत.
कामेश्वर मिश्रा हे मुझफ्फरपूरमधील रहिवासी असून ते सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत वृद्धापकाळ पेन्शनचे लाभार्थी आहेत. रविवारी ते पेन्शनची रक्कम काढण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) येथे गेले होते. पेन्शन काढल्यानंतर त्यांनी खात्यातील शिल्लक तपासली असता त्यांच्या खात्यात ७५९ कोटी ६९ लाख ५१ हजार ९५१ रुपये असल्याचे दिसून आले. याच वेळी त्यांच्या दिव्यांग मुलानेही आपल्या खात्यातील शिल्लक तपासली. त्याच्या खात्यातही प्रचंड रक्कम दिसून आली. त्यामुळे दोन्ही खात्यांतील एकूण शिल्लक १,५०० कोटी रुपयांहून अधिक असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. हा आकडा पाहून सीएससी केंद्रावरील ऑपरेटर आणि उपस्थित नागरिकांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
कामेश्वर मिश्रा यांनी इतकी मोठी रक्कम त्यांच्या खात्यात कशी दिसली, याबाबत आपण पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे सांगितले. बँक आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून नेमके कारण स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली असून खात्यातील त्रुटी तातडीने दुरुस्त करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.
हे ही वाचा:
संरक्षण क्षेत्रात क्रांती! ‘अस्त्र’ क्षेपणास्त्र निर्मितीत खासगी कंपन्यांचा सहभाग
भारतीय वंशाचे अनिल मेनन घेणार अंतराळात ऐतिहासिक झेप
युद्धाच्या सावटाखाली बाजार कोसळला; सेन्सेक्स ६४९ अंकांनी खाली
अमेरिकेचे इराणवर पुन्हा हल्ले; क्षेपणास्त्र प्रणाली, आयआरजीसीच्या स्पीडबोट्स लक्ष्य
प्राथमिक माहितीनुसार, ही घटना बँकेच्या तांत्रिक बिघाडामुळे किंवा सर्व्हरमधील त्रुटीमुळे घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत बँकेकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू असून नेमके कारण शोधले जात आहे.







