22 C
Mumbai
Tuesday, January 31, 2023
घरविशेषअजितदादा आव्हाडांच्या पंगतीत बसले!

अजितदादा आव्हाडांच्या पंगतीत बसले!

संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा

Google News Follow

Related

नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या नामकरणावर आपली भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते. त्यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे आहे. यावरुन आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

संभाजी राजे धर्मवीर नव्हते, हे तुम्ही कोण ठरवणार. संभाजी राजेंना धर्मवीर ही पदवी कुठल्या विद्यापीठाने बहाल केलेली नव्हती. इतिसाहाच्या सुवर्ण अक्षरात कोरले गेलेले हे नाव आहे. हिंदूस्थानच्या जनतेने, महाराष्ट्राने त्यांना धर्मवीर ही पदवी दिली, बहाल केली. जनसामान्यांच्या भावना दुखावण्याचा अधिकार अजित पवारांना कुणी दिला. संभाजी राजांनी दिलेल्या बलिदानाला या नावाने गौरवले आहे. अजित पवार संभाजी राजे धर्मवीर नव्हते, असे म्हणताहेत त्याला कोणता दाखला देत आहेत. की अजित पवार जे म्हणतात ते पूर्वदिशा मानायचे. मूळात संभाजी राज्यांबद्दल बोलायला आपली तेवढी पात्रता आणि योग्यता आहे हे प्रत्येकाने ओळखले पाहिजे. कोणत्या व्यक्तीबद्दल बोलतोय, काय बरळतोय याची जाण ठेवायला हवी. उद्या छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती नव्हतेच हेही म्हणायला हे कमी करणार नाहीत.

राष्ट्रवादी पक्षाचे जे राजकीय तत्त्वज्ञान आहे ते संभाजी ब्रिगेड स्कूल ऑफ थॉट्समधून आलेले आहे. राष्ट्रवादीने नेहमीच त्यांचे राजकारण हिरवेकरणाच्या मुद्द्यावर केले आहे. इतिहासातले हिरवेकरण राष्ट्रवादी पक्षात आहे. मतांच्या राजकारणासाठी साडेतीन जिल्ह्यांचे नेते शरद पवारांनी हीच लाइन घेऊन आपल्या पोळ्या भाजून घेतल्या आहेत. शरद पवारांनी राजकारण असेच केलेय, परंतु अजित पवारांनी जातीपातीचे राजकारण केलेले नाही. दादांनी मुस्लिम मतांसाठी कधीच लांगुलचालन केलेले नाही. त्यांची कधी बाजू घेताना ते दिसलेले नाहीत. अजित पवारांनी नेहमीच मनाचा मोठेपणा दाखवला आणि त्याच पद्धतीचे राजकारण ते करत आलेत. हे राष्ट्रवादीचे तत्त्वज्ञान असले तरी अजित पवार यातून अलग राहिले. परंतु वाण नाही पण गुण लागतो अशा म्हणीनुसार अजित पवारांनी आता त्यात उडी घेतलीय.

हेही वाचा :

२०२३ वर्ष आशेचे, आनंदाचे आणि भरपूर यशाचे जावो

चंदा कोचर यांचा ‘पद्म’ पुरस्कार काढून घेणार का? 

तोरा संपलाय, नक्षा उतरलाय!

अजित पवार म्हणाले ते आपण पाहूया. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण काहीजण जाणीवपूर्वक धर्मवीर, धर्मवीर उल्लेख करतात. मी मंत्रिमंडळात असतानाही त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं, संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा, असे म्हणत अजित पवार जनतेचे दिशाभूल करताहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. तसेच त्यांना जोरदार प्रत्युत्तरही दिले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचे रक्षण केले. धर्म, स्वधर्म आणि हिंदू धर्म यांचे रक्षण केले. त्यांना औरंगजेबाने का मारलं? संभाजी महाराजांना धर्मांतर करण्यासाठी सांगितले गेले, पण त्यांनी मान्य केले नाही. स्वदेश, स्वभूमी आणि स्वधर्मासाठी हालअपेष्टा होऊन त्यांचे बलिदान झाले. त्यांच्या शरिराचे अक्षरशः तुकडे केले. तरी छत्रपती संभाजी महाराजांनी स्वधर्म, स्वराष्ट्राची भाषा सोडली नाही. म्हणून अजित पवार आणि त्यांच्या विचारांच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक तर होतेच पण ते धर्मवीर देखील होते असे म्हणत दादाना दणका दिलाय.

मंत्री शंभुराज देसाई यांनीही अजित पवारांचा खरपूस समाचार घेतला आहे. अजित पवारांचे वक्तव्यं लोकासांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण अशा पद्धतीचं असल्याचे सांगत टीका त्यांनी केली.

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका आणली. तुम्ही मालिका जेव्हा दाखवता तेव्हा तिचा इतिहास घरोघरी पोहोचतो. संभाजी महाराजांची योग्य प्रतिमा जनसामान्यांना दाखवायला हवी होती. अमोल कोल्हे यांनी ही मालिका बनवूनही संभाजी राजे हे धर्मवीर नाहीत हे ठरवू शकणार नाहीत. या मालिकेमध्ये धर्मवीर संभाजी राजेंचा मृत्यू कसा झाला हे दाखवण्याची हिंमत ते करू शकलेले नाहीत. याचा अर्थ तुम्ही सोयीचे राजकारण करत आहात असेच होते.

एखाद्या व्यक्तीने हिंदू धर्मासाठी त्याग केला, जीवन अर्पण केले की त्याची नालस्ती करायची, त्याला कमी लेखायचे, त्याची हेटाळणी करायची हे राष्ट्रवादी काँग्रेसचे धोरण राहिलेले आहे. आतापर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल ही अपमानाची भाषा वापरली जात होती. पण आता थेट संभाजी महाराजांनाही ते हिंदू नव्हते, हिंदू धर्मासाठी त्यांनी बलिदान दिले नाही हे म्हणण्यापर्यंत मजल गेलेली आहे. तुम्ही मुस्लिम लांगुलचालनासाठी किती खाली घसरणार आहात?

शिवरायांच्या कथित अपमानावरून गेले काही दिवस महाराष्ट्रात राजकारण होत आहे. त्यावेळी राज्यपाल कोश्यारी, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड यांना लक्ष्य केले गेले. त्यांच्यावर गलिच्छ आरोप केले गेले, शब्दप्रयोग केले गेले. पण त्या सगळ्यांनी आपल्याकडून कोणतीही चूक झालेली नसताना दिलगिरी व्यक्त केली. माफी मागूनही मविआचे नेते आंदोलन करत राहिले. आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराजांविषयी जाणीवपूर्वक हे वक्तव्य केले आहे, त्याविषयी मविआतील एकाही नेत्याने आवाज उठवलेला नाही की प्रतिक्रिया दिलेली नाही. ते कुठल्या बिळात जाऊन बसलेत. बहुतेक मविआचे हे नेते आपल्या सोयीनुसार राजकारण करतात हे आता सिद्ध झाले आहे.

याच मुस्लिम लांगुलचालनापोटी अफजल खान हा कसा धर्मप्रसारासाठी नव्हे तर आपली सीमा विस्तारण्यासाठी आला होता, अफजल खानाच्या कबरीसाठी शिवाजी महाराजांनी जमीन दिली होती, अशी भूमिका राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी मांडली होती. त्यांच्या पंक्तीत अजित पवार आज जाऊन बसले आहेत.

मुघलांनी संभाजी महाराजांचे धर्मपरिवर्तन करण्यासाठी ४० दिवस नरक यातना दिल्या. तुम्ही धर्मपरिवर्तन करा, मुस्लिम धर्म स्विकारा आम्ही तुम्हाला सोडतो, असं सांगितले होते. परंतु त्याला संभाजीराजे जुमानले नाहीत. पण संभीजीराजांनी प्राणाची आहुती दिली, धर्म सोडला नाही. मग संभाजी महाराजांना धर्मवीर का म्हणायचे नाही. संभाजी महाराजांनी धर्मासाठी दिलेले बलिदान योग्य नाही, असं दादांना वाटतं का, अशी सर्वसामान्यांची भावना आहे.

छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर स्वराज्य टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी शत्रूशी समर्थपणे व प्राणपणाने लढणारे धर्मवीर!

मृत्यूचे आव्हान पेलुनी, तोच वारसा आम्हाला दिला। शिवरायांचा शंभू छावा, हिंदू म्हणुनी अमर जाहला।।

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,916चाहतेआवड दर्शवा
2,004अनुयायीअनुकरण करा
61,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा