श्री महाकालाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या उजैनमध्ये अमरिषभाई पटेल यांचा जन्म झाला. त्यांचा राजकारणाशीही असेला संबंध अगदी घटट् आहे, परंतु त्यांची खरी ओळख शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळेच आहे. राजकारण आणि शिक्षण याच्या पलिकडेही त्यांनी एक मोठे विश्व निर्माण केलेले आहे.
१९८५ मध्ये शिरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. १९९० ते २००४ या काळात काँग्रेस तिकिटावर चार वेळा शिरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. काही काळ शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण खात्याचे मंत्री पद त्यांनी भूषविले. नंतर ते विधानपरिषदेचे सदस्यही राहिले. सध्या ते भाजपाचे विधान परीषदेतील आमदार आहेत.
शिरपुर एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून त्यांनी शिक्षण क्षेत्रातील काम सुरू केले. पूर्व-प्राथमिक ते पदव्युत्तर शिक्षण उपलब्ध करून देणाऱ्या ७० पेक्षा जास्त संस्थांची स्थापना केली. आज ४० हजारावर विद्यार्थी या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतात. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे काम फक्त ग्रामीण भागा पुरते मर्यादीत राहीले नाही. मुंबईपर्यंत त्यांनी या कामाचा व्याप वाढवला. हे करताना त्यांनी शिक्षणाच्या दर्जावर कायम लक्ष्य केंद्रीत केले. शिक्षण माणसाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारे माध्यम आहे, याची त्यांनी सतत जाणीव ठेवली. आपल्या शिक्षण संस्थांमधून जे विद्यार्थी शिकतायत, त्यांचे आय़ुष्य उजळून निघेल असे प्रयत्न केले. शिक्षणात कालानुरुप बदल हवा, या मताशी ते कायम ठाम राहीले.
हे ही वाचा:
कोलकात्यात विद्यार्थीनीवरील बलात्कारात तृणमूल नेता!
मनू भाकर घडवणारा महान मार्गदर्शक!
आणीबाणी : संविधानाची हत्या, लोकशाहीच्या मुस्कटदाबीला झाली ५० वर्षे!
मुंबईतील श्री विलेपार्ले केळवणी मंडळ या अत्यंत महत्वाच्या शैक्षणिक उपक्रमाचे ते अध्यक्ष आहेत. या संस्थेच्या आसपास असलेल्या फार कमी शिक्षण संस्था मुंबईत असतील. ७ शाळा, १२ महाविद्यालये, ६२ हजार विद्यार्थी आणि १९०० शिक्षक असा या संस्थेचा मोठा पसारा आहे. त्यात मिठीबाई, नरसी मोनजी इस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अशा बड्या शिक्षण संस्थांचा समावेश आहे. आपल्या मुलाला किंवा मुलीला या शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश मिळावा अशी बहुतेक पालकांची इच्छा असते. इथून शिकून नावारुपाला आलेली अनेक मोठी नावे सांगता येतील.
एका कार्यक्रमात सहा सात वर्षांपूर्वी आमची भेट झाली. मी त्यांना माझा परिचय करून दिला. त्यांनी मोठ्या आस्थेने माझी चौकशी केली. जुहूमध्ये त्यांचे एनएनआयएमएसच्या इमारतीत त्यांचे कार्यालय आहे, तिथे त्यांनी मला भेटायला बोलावले. त्यानंतर आमच्या अनेक गाठीभेटी झाल्या. त्यांची कार्यपद्धती पाहिली की ते अनेक क्षेत्रात उत्तम काम कसे करतात, याचे आश्चर्य वाटत नाही. काम, काळ, वेगाचे गणित त्यांना व्यवस्थित जमले आहे. आपल्या सगळ्यांकडे दिवसाचे २४ तास असतात, काही जण याच वेळेत नवीन विश्व निर्माण करतात, काही जणांना जेमतेमही करता येत नाही. ज्यांना हे जमते, त्यांचा मी चाहता आहे. मी सतत त्यांचे निरीक्षण करत असतो. त्यांच्याकडून शिकत असतो. माझ्या दृष्टीने हे शिक्षण आहे. असे शिक्षण जे माझ्या आयुष्यात कायम भर घालत असते. अमरिषभाई हे केवळ शिक्षण संस्थांचे कर्ताधर्ता नाहीत, ते स्वत:च एक विद्यापीठ आहेत. अलिकडे माझा मुलगा विवान याने त्यांची भेट घेतली. विवानचे वय १८ आहे, तो वयाच्या पंधराव्या वर्षापासून लिहीतोय, त्याची दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत, हे समजल्यावर त्यांनी विवानचे तोंड भरून कौतूक केले. विवानसाठी तो एक सुंदर अनुभव होता.
महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात ठसा उमटवणारे अमरिषभाई यांच्याकडे ग्रामविकासाचा ठोस दृष्टीकोन आहे. शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी त्यांनी राबवलेला ‘शिरपूर पॅटर्न’ जलसंपदा आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात अत्यंत यशस्वी ठरला आहे. २००४ मध्ये या धोरणाची मुहुर्तमेढ रोवण्यात आली. कोवीड महामारीच्या काळात शिरपूर एज्युकेशन सोसायटी असो वा केळवणी मंडळ, या दोन्ही संस्थांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करत विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही, याची व्यवस्था केली. कोवीड ओसरल्यानंतरही त्यांनी ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवले. त्यासाठी सढळ हस्ते पैसा खर्च केला. जगात ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, असे लोक कमी नाहीत. पैसा आहे आणि दानत आहे, अशांचा आकडा मात्र कमी आहे.
शिक्षण, जलसंपदा, ग्रामीण विकास आणि राजकारण अशा सगळ्या क्षेत्रात काम करताना त्यांनी ठसा उमटवला. लोकांच्या जीवनावर या कामाचा अत्यंत सकारात्मक प्रभाव निर्माण झाला. त्यांनी जे काही सुरू केले, ते आता बऱ्यापैकी नावारुपाला आलेले आहे. येत्या काळात अधिक काही तरी भव्यदिव्य त्यांच्या हातून निश्चितपणे घडेल अशी मला खात्री आहे.
