संपूर्ण उत्तराखंडमध्ये खळबळ उडवणाऱ्या अंकिता भंडारी हत्याकांडात उद्या म्हणजेच ३० मे रोजी कोटद्वार न्यायालय अंतिम निकाल सुनावणार आहे. या प्रकरणाची सुरूवात सप्टेंबर २०२२ मध्ये झाली होती आणि तब्बल २ वर्षे ८ महिने या खटल्याची सुनावणी सुरु होती.
२२ वर्षांची अंकिता भंडारी, ही पौडी जिल्ह्यातील यमकेश्वर ब्लॉक येथील वनतारा रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. १८ सप्टेंबर २०२२ रोजी ती अचानक गायब झाली. २४ सप्टेंबरला तिचा मृतदेह चिला पॉवर हाउसच्या नहरमध्ये सापडला होता.
या प्रकरणात रिसॉर्टचा मालक पुलकित आर्य, तसेच सौरभ भास्कर व अंकित गुप्ता या तिघांवर हत्या आणि पुरावे लपवण्याचे आरोप ठेवण्यात आले. पुलकित आर्य हा या हत्याकांडाचा मुख्य आरोपी आहे.
डीआयजी पी. रेणुका देवी यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक (SIT) तयार करण्यात आले होते. ५०० पानी आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले असून, यामध्ये SIT ने ९७ साक्षीदारांची यादी दिली होती. प्रत्यक्षात त्यातील ४७ प्रमुख साक्षीदारांना कोर्टात हजर करण्यात आले.
३० जानेवारी २०२३ रोजी कोटद्वारमधील ADJ कोर्टात पहिली सुनावणी झाली होती. २८ मार्च २०२३ पासून सरकारी वकिलांची साक्ष सुरु झाली. १९ मे २०२५ रोजी दोन्ही पक्षांचे युक्तिवाद पूर्ण झाले आणि न्यायालयाने ३० मे रोजी निकाल देण्याची घोषणा केली.
दरम्यान, कोर्ट परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बैरिकेडिंग लावण्यात आली असून, उद्या भारी पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे.
