तामिळनाडूमधील भाजपाचे प्रमुख के. अण्णामलाई यांनी अभिनेता आणि आता स्वतःचा पक्ष स्थापन करणारा विजय थलपती याच्यावर खरपूस टीका केली आहे. भाषेच्या मुद्द्यावरून सध्या तामिळनाडूमधील राजकारण तापले आहे. त्यासंदर्भात अण्णामलाई यांनी ही टीका केली आहे.
विजय याने काढलेल्या तामिळगा वेत्री कझगम (टीव्हीके) या पक्षाने दोन भाषांचा पुरस्कार केला आहे. पण त्याच्या स्वतःच्या विजय विद्याश्रम या शाळेत मात्र त्रिभाषासूत्रीचा वापर होतो. त्यावरून अण्णामलाई यांनी टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मला विजय यांना एक सांगायचे आहे की, तुम्हाला जे शिकवले आहे तेच तुम्ही अमलात आणा. तुम्ही खोटे का बोलता ? तुमची मुले तर तीन भाषा शिकतात. तुम्ही विजय विद्याश्रम ही जी शाळा चालवता, त्यात तर तीन भाषा शिकवल्या जातात. पण टीव्हीके पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मुलांना मात्र दोनच भाषा शिकण्याची सक्ती केली जाते. कोईमतूर येथे झालेल्या एका भाषणात अण्णामलाई यांनी विजय यांच्यावर ही टीका केली.
हे ही वाचा:
महाकुंभाची समाप्ती, मुख्यमंत्री प्रयागराजमध्ये दाखल, गंगा पूजेत सहभागी!
हमासकडून युद्धबंदी कराराअंतर्गत चार ओलिसांचे मृतदेह सुपूर्द
अफगाणिस्तनाने इंग्लंडला लोळवले, ८ विकेट्सनी मात
सध्या तामिळनाडूमधील डीएमके सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात त्रिभाषासूत्रावरून संघर्ष सुरू आहे. भाजपाकडून तामिळनाडूमध्ये हिंदी भाषा अंतर्भूत केली जाईल, अशी भीती डीएमकेकडून व्यक्त केली जात आहे. हा संघर्ष म्हणजे लहान मुलांचा संघर्ष असल्याची टीका विजय यांनी केली होती.
अण्णामलाई यांनी विजय यांच्या गेट आऊट या मोहिमेवर टीका केली. गेट आऊट लिहिलेल्या बोर्डवर विजय आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वाक्षरी केली. या कार्यक्रमात आलेले निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मात्र या बोर्डवर स्वाक्षरी केली नाही, असे निरीक्षण अण्णामलाई यांनी नोंदविले.
तामिळनाडूच्या राजकारणात प्रशांत किशोर यांचे काम काय असा सवाल अण्णामलाई यांनी विचारला. ते म्हणाले की, प्रशांत किशोर म्हणतात की, त्यांना महेंद्रसिंग धोनीप्रमाणे तामिळनाडूने त्यांना स्वीकारावे. पण लोक तुम्हाला कधीही क्षमा करणार नाहीत. कारण जे राज्यासाठी चांगले काही करतात, त्यांचे स्वागत तामिळी जनता करते. धोनी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. इथली भाषा माहीत नसतानाही धोनीने तामिळनाडूला स्वीकारले. त्यामुळे आम्ही त्याला आमच्या मुलाप्रमाणे वागणूक दिली.