अमेरिकेत ट्रम्प सरकार येताच बांगलादेशातून अनेक बातम्या समोर येत आहेत. शेख हसीना बांगलादेशात परत येऊ येवू शकतील का?. तसेच मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार पडणार का?, अशा प्रकारचे प्रश्न आता बांगलादेशात निर्माण होत आहेत. अशी परिस्थिती निर्माण होण्याचे कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी बांगलादेशला दिल्या जाणाऱ्या सर्व मदतीवर बंदी घातली होती. यानंतर, अस्थिरतेच्या भीतीने माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या पक्षाने अनेक मुद्द्यांवर मोहम्मद युनूस यांना घेरण्यास सुरुवात केली आहे.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान हसीना शेख यांच्या अवामी लीग पक्षाने मोहम्मद युनूस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे बांगलादेशात खळबळ उडाली आहे. अवामी लीग पक्षाने अंतरिम सरकारच्या राजीनाम्याच्या मागणीसह देशभरात निदर्शने करण्याची घोषणा केली आहे.
बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू समुदायावर ‘अत्याचार’ होत असल्याचा आरोप अवामी लीगने केला आहे. अवामी लीगचा हा पहिला मोठा निषेध आहे, ज्यांचे बहुतेक नेते गेल्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी हसीना शेख यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडल्यापासून अटकेत आहेत किंवा भूमिगत आहेत. याच दरम्यान, अवामी लीगने युनूस सरकार विरोधात आवाज उठवण्याची घोषणा केली आहे. पक्षाने फेसबुक पेजवर पोस्ट केलेल्या निवेदनानुसार, अंतरिम सरकारच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पक्ष १ फेब्रुवारीपासून रस्त्यावर उतरून उपोषण आणि नाकाबंदी करणार आहे.
हे ही वाचा :
बांगलादेशात १६ वर्षीय हिंदू मुलीचे अपहरण, पोलिसांकडून दुर्लक्ष!
राहुल गांधीचा अरविंद केजरीवालांवर निशाणा
सुनीता विल्यम्स यांच्या घरवापसीसाठी ट्रम्प यांनी स्पेसएक्सकडे मागितली मदत
महाकुंभ: मौनी अमावस्येला भाविकांचा महापूर, ४ कोटी भक्तांचे स्नान!
शनिवार ते बुधवार या कालावधीत पक्ष आपल्या मागण्यांसाठी पॅम्प्लेट वाटून प्रचार करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अवामी लीगच्या निवेदनानुसार, ६ फेब्रुवारी रोजी देशभरात निषेध मोर्चे आणि रॅली काढण्यात येतील, त्यानंतर १० फेब्रुवारीला निदर्शने आणि रॅली होतील. १६ फेब्रुवारीला देशव्यापी नाकाबंदी करणार असून १८ फेब्रुवारीला सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपोषण करणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे. या निवेदनात पक्षाने हसीना शेख यांचा ‘पंतप्रधान’ म्हणून उल्लेख केला आहे.