क्रिकेट विश्वातील थरारक अशी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळवली जात असून शनिवार, २२ फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सामना रंगला आहे. पाकिस्तानमधील लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात आयोजांकडून हे मोठी चूक झाल्याचे पाहायला मिळाले. सामान्यापूर्वी मैदानावर भारताचे राष्ट्रगीत लावण्यात आल्याची घटना घडली.
शनिवारी, २२ फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यापूर्वी लाहोरमध्ये चुकून ऑस्ट्रेलियन राष्ट्रगीताऐवजी भारतीय राष्ट्रगीत वाजवण्यात आले. गद्दाफी स्टेडियममधील या चुकीनंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला, परंतु आयोजकांना चूक लक्षात आली आणि त्यांनी भारतीय राष्ट्रगीत थांबवले. आयोजकांच्या या चुकीची सर्वत्र चर्चा होत असून आश्चर्य देखील व्यक्त केले जात आहे. भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफीतील कोणताही सामना लाहोरमध्ये किंवा पाकिस्तानमध्ये खेळण्याची योजना नाही त्यामुळे भारताचे राष्ट्रगीत कसे वाजले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या स्पर्धेसाठी भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला आणि त्यानंतर हायब्रिड मॉडेल स्वीकारण्यात आले. भारत त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने आयोजित केलेल्या प्रत्येक क्रिकेट सामन्यापूर्वी, दोन्ही संघांचे राष्ट्रगीत वाजवले जाते. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे राष्ट्रगीत वाजणे अपेक्षित होते. यापूर्वी स्पर्धा सुरू होण्याआधी कराचीच्या राष्ट्रीय स्टेडियमवर इतर सर्व स्पर्धक संघांचे झेंडे असताना भारतीय ध्वज फडकवण्यात आला नव्हता. यावरून टीका झाल्यानंतर भारताचा तिरंगा फडकावण्यात आला.
हे ही वाचा..
बांगलादेशींनी वरुण सरदेसाई, आदित्य ठाकरेंना निवडून आणलं
उत्तर प्रदेशातील ९०,००० कैद्यांनी केले पवित्र स्नान!
सकल हिंदू समाजाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अनधिकृत थडग्यावर पालिकेची कारवाई
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी
ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच, भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. अनेक महिने यावरून वाद सुरू होता. पाकिस्तानने हायब्रिड मॉडेलच्या कल्पनेला विरोध केला होता, मात्र पुढे हे मॉडेल स्वीकारले. २०२५ मध्ये महिला एकदिवसीय विश्वचषक आणि २०२६ मध्ये पुरुषांच्या टी- २० विश्वचषकासह भारतातील आगामी आयसीसी स्पर्धांसाठी देखील हेच मॉडेल वापरले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.