भारताचे सहायक प्रशिक्षक रयान टेन डेशकाटे यांनी सांगितले की, जसप्रीत बुमराह २ जुलैपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी निवडीसाठी उपलब्ध आहे. मात्र त्याच्या खेळण्याबाबतचा अंतिम निर्णय सामन्याच्या तोंडावर घेतला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
बुमराह सध्या बर्मिंगहॅममध्ये नेट्समध्ये जोरदार सराव करत आहे आणि संघ व्यवस्थापन व मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसोबत सातत्याने चर्चा करत आहे. लीड्स कसोटीत ५ बळी घेतल्यानंतर त्याला सावरण्यासाठी ८ दिवसांचा कालावधी मिळालेला आहे.
डेशकाटे म्हणाले, “तो फिट आहे आणि पूर्णपणे उपलब्ध आहे. आम्ही आधीच ठरवलं होतं की तो मालिकेत पाचपैकी फक्त तीन कसोट्या खेळेल. त्यामुळे परिस्थिती, खेळपट्टी, हवामान आणि पुढील चार सामन्यांसाठीचा विचार करून आम्ही निर्णय घेणार आहोत. लॉर्ड्स, मँचेस्टर किंवा ओव्हलसाठी त्याला विश्रांती देणं फायदेशीर ठरेल का, यावर विचार सुरू आहे.”
कॅचिंगवर फोकस, यशस्वी जायस्वाल स्लिपमधून बाहेर
हेडिंग्ले सामन्यात भारताने ६ झेल गमावले होते, त्यातील ४ चुकवलेले झेल यशस्वी जायस्वालकडून आले. त्यामुळे आता स्लिप कॅचिंगमध्ये बदल करण्यात आला आहे.
पहिली स्लिप – करुण नायर
दुसरी स्लिप – के. एल. राहुल
तिसरी स्लिप – शुभमन गिल
गली – नीतीश रेड्डी
चौथी स्लिप – साई सुदर्शन
यशस्वीला गली क्षेत्ररक्षणातून काही काळासाठी विश्रांती देण्यात आली आहे. डेशकाटे म्हणाले, “त्याचे आत्मविश्वास पुनर्स्थापित करणं महत्त्वाचं आहे. त्याचे हात खूप दुखत होते. आम्ही बहुपर्यायी फील्डिंग युनिट तयार करत आहोत.”
दोन फिरकीपटूंना मिळणार संधी? वॉशिंग्टन सुंदर आघाडीवर
एजबॅस्टनची खेळपट्टी कोरडी आणि खवखवलेली असल्यामुळे भारत दोन फिरकीपटूंना खेळवण्याची शक्यता आहे.
या शर्यतीत वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांच्यात चुरस आहे. सुंदरकडे फलंदाजीचंही कौशल्य असल्यामुळे त्याला थोडीशी आघाडी असल्याचं डेशकाटे म्हणाले.
त्यांनी सांगितलं, “तीनही फिरकीपटू (सुंदर, जडेजा, कुलदीप) छान गोलंदाजी करत आहेत. पण फलंदाजीची खोलीही आमच्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे कोणता ऑलराउंडर खेळवायचा आणि कोणत्या संयोजनात जायचं, याचा विचार सुरू आहे.”
शार्दुल की नीतीश? ऑलराउंडर निवडीत डोकेदुखी
नीतीश रेड्डी हे भारताचे प्रमुख बल्लेबाज ऑलराउंडर आहेत. ऑस्ट्रेलियातील कामगिरी लक्षात घेता, त्याला संधी मिळू शकते.
मागील सामन्यात भारताने गोलंदाज ऑलराउंडर म्हणून शार्दुल ठाकुरची निवड केली होती.
डेशकाटे म्हणाले, “नीतीश सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याला दुसऱ्या कसोटीत खेळण्याची खूप चांगली संधी आहे. आम्ही संघाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहोत.”
पावसाचं सावट, खेळपट्टीवर नजर
१, ४ आणि ५ जुलै या दिवशी पावसाची शक्यता आहे. पिच खाली कोरडी आणि वरून थोडी गवताळ आहे, त्यामुळे खेळपट्टीवर गती व फिरकी दोघांनाही मदत होण्याची शक्यता आहे.
